विजयपूरमध्ये भावसार क्षत्रिय समाजाच्या नवरात्रोत्सवात गरबा-दांडियाची धूम
*अध्यक्ष राजेश देवगिरी व पंचमंडळाच्या नेतृत्वाखाली आयोजन; महिला आणि युवकांचा उत्स्फूर्त सहभाग*
विजयपूर / प्रतिनिधि - दिपक शिंत्रे
नवरात्रोत्सवानिमित्त विजयपूर शहरात गरबा आणि दांडियाचा उत्साह शिगेला पोहोचला असून, भावसार क्षत्रिय समाजाच्या नवरात्रोत्सवात धार्मिक भक्तीसह सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक गरबा-दांडियाच्या तालावर महिला, युवक-युवती आणि समाजबांधव उत्साहाने सहभागी होत असून, या उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडत आहे.
*दिनांक 20 ऑक्टोबर मंगळवार रोजी गरबा सादरीकरण तर दि. 21 ऑक्टोबर रोजी दांडिया फाइनलचे आयोजन करण्यात आले आहे*
भावसार क्षत्रिय समाजाचे अध्यक्ष राजेश देवगिरी व पंचमंडळाच्या सदस्यांच्या नेतृत्वाखाली नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. नंदा पुकाळे, युवक समितीचे अध्यक्ष नितीन मिरजकर, तरुण संघाचे अध्यक्ष विनायक कुंटे भावसार क्रिकेट टीमचे दत्ता सुलाखे,तसेच नवरात्रोत्सव समितीच्या सदस्यांच्या सहकार्याने विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.
नवरात्रोत्सवात देवीच्या आराधनेबरोबरच गरबा आणि दांडियाच्या माध्यमातून पारंपरिक संस्कृती जपण्यावर भर दिला जात आहे. रंगीबेरंगी पारंपरिक वेशभूषा, संगीताचा ठेका आणि गरबा-दांडियाच्या तालावर थिरकणारी पावले यामुळे उत्सवाला विशेष रंगत येत आहे. महिला, तरुणी आणि युवकांच्या सक्रिय सहभागामुळे कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
समाजातील सर्व घटकांना एकत्र आणून धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक बंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून नव्या पिढीला समाजाप्रती अभिमान, भारतीय संस्कृती आणि पारंपरिक कलांची ओळख व्हावी, यासाठी अशा उपक्रमांचे विशेष महत्त्व आहे.
*सूत्रसंचालनातून कार्यक्रमाला रंगत*
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक शिंत्रे हे करीत असून त्यांच्या सूत्रसंचालनामुळे कार्यक्रमात उत्साहपूर्ण वातावरण निर्माण होत आहे
भावसार क्षत्रिय समाजाच्या या नवरात्रोत्सवातून भक्ती, परंपरा, सांस्कृतिक जतन आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला जात आहे. समाजबांधवांच्या एकजुटीमुळे विजयपूरमधील नवरात्रोत्सवाला विशेष रंगत प्राप्त झाली आहे.