लिंगायत धर्माला मान्यता आणि अल्पसंख्याक दर्जा देण्याची मागणी, जिल्हाधिकारांना निवेदन
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
लिंगायत धर्माला मान्यता आणि अल्पसंख्याक दर्जा देण्यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बसव तत्त्वज्ञान आणि संशोधन केंद्राचे अध्यक्ष डॉ. शशिकांत पटन यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व सदस्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी डॉ. आनंद के. यांना निवेदन सादर केले.
यावेळी बोलताना पुणे येथील बसव तत्त्वज्ञान आणि संशोधन केंद्राचे अध्यक्ष डॉ. शशिकांत पटन यांनी सांगितले की, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी न्यायमूर्ती नागमोहनदास यांच्या अहवालाच्या आधारे त्यांच्या मागील सरकारच्या शिफारशीला बळकटी देऊन लिंगायत धर्मीयांना अल्पसंख्याक म्हणून मान्यता देण्यासाठी पुन्हा केंद्र सरकारकडे पुनर्विचार याचिका दाखल करावी आणि बसवण्णा तसेच लिंगायत समाजाला न्याय द्यावा.
शहरातील राज्यातील एकमेव महिला विद्यापीठात बसव अध्ययन पीठ पूर्ण क्षमतेने स्थापन करून अधिक आर्थिक निधी द्यावा, तसेच शरण साहित्याच्या संशोधन, संपादन व प्रकाशनासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच, धाडसी शरणी अक्कमहादेवी या शरण परंपरेतील महान साधिका असून त्या अर्धनग्न अवस्थेत आल्या नव्हत्या याचे अनेक संदर्भ आणि पुरावे उपलब्ध आहेत. मात्र, त्यांना अर्धनग्न स्वरूपात दर्शविल्यामुळे महिला समाज आणि सुसंस्कृत समाजाला लाजिरवाणे वाटते. त्यामुळे अक्कमहादेवी विद्यापीठातील अर्धनग्न पुतळा हटवून त्या ठिकाणी शालीन वस्त्रांतील अक्कमहादेवींचा पुतळा बसवावा, अशी मागणी डॉ. पटन यांनी केली.
या विषयावर यापूर्वीही आंदोलन करून निवेदन देण्यात आले होते, तरीही कोणतीही दखल घेतली गेली नाही. आताही मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला.
यावेळी डॉ. सरस्वती पाटील, रेनुका पाटील, आर. एस. बिरादार, रत्नक्का बिरादार, सिद्धप्पा पडनाड, उद्योजक गंगाधर सालक्की, शरणू सबरद, आर. एस. पाटील, मल्लिकार्जुन मुरगोड, संख सर, शैला इंदुशेखर मणूर, डॉ. शारदामणी हुणश्याळ, रेखा बिरादार आदी उपस्थित होते.
