विजयपूरमध्ये एक धक्कादायक, अमानुष घटना
मुलगा आपल्यासारखा दिसत नाही म्हणून स्वतःच्या मुलाची हत्या करणारा पिता
विजयपूर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
जिल्ह्यातील नागठाण गावातील सिद्धार्थ मल्लिकार्जुन अरकेरी (वय 6 वर्षे) हा मृत मुलगा असून, त्याची हत्या त्याच्याच वडिलांनी केली आहे.
मल्लिकार्जुन अरकेरी याला गावातील काही लोक “तुझा मुलगा तुझ्यासारखा दिसत नाही” असे म्हणून वारंवार चिडवत होते. या सततच्या टोमण्यांमुळे संतप्त होऊन त्याने स्वतःच्या मुलाची हत्या केली.
मार्च 16 रोजी मुलाला शाळेत प्रवेश देतो असे सांगून तो त्याला घेऊन गेला आणि महाराष्ट्रातील कराड जिल्ह्यातील वडोलीजवळ कृष्णा नदीकाठी नेऊन नदीत ढकलून त्याची हत्या केली.
यानंतर त्याने मुलाला सिंदगी येथे शाळेत घालून हॉस्टेलमध्ये ठेवले असल्याचे कुटुंबीयांना सांगितले.
एप्रिल 1 रोजी मुलाच्या वाढदिवशी आई भाग्यश्री हिने मुलाला घरी आणण्याचा आग्रह धरला. त्यानंतर मुलगा कुठे आहे असे विचारले असता मल्लिकार्जुन घरातून पळून गेला. यामुळे संशय निर्माण होऊन पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.
पोलिसांच्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने महाराष्ट्रात हत्या केल्याचे सांगितले. मार्च 16 रोजी कराडच्या मसूर पोलिस ठाण्याने अज्ञात मुलाच्या मृतदेहाबाबत प्रसिद्धीपत्रक जारी केले होते. त्या माहितीच्या आधारे आणि आरोपीच्या कबुलीजबाबावरून मुलाचा मृतदेह सापडला.
तपासादरम्यान या हत्येचा उलगडा झाला असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख
लक्ष्मण निंबरगी यांनी दिली आहे.
