बेकायदेशीर तांदूळ वाहतूक: दोघांविरुद्ध गुन्हा दाखल 32,850 किलो तांदूळ जप्त
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
अन्न भाग्य योजनेअंतर्गत बेकायदेशीर तांदूळ वाहतूक प्रकरण उघडकीस आणत अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोघांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातील रेशन तांदूळ जप्त करण्यात आला. ही घटना तालुक्यातील हिट्टिनहल्ली गावाजवळ हॉटेल साहिलसमोर राष्ट्रीय महामार्गावर घडली.
महांतेश हनमप्पा बालकनवर आणि हनुमेश दोड्डबसप्पा गोनाळ यांच्याविरुद्ध विजयपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्न भाग्य योजनेअंतर्गत वितरित होणारा तांदूळ बेकायदेशीररीत्या वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर अन्न विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून बेकायदेशीररित्या वाहतूक होत असलेला तांदूळ आणि लारी जप्त केली. आरोपींकडून 32,850 किलो तांदूळ तसेच लारी जप्त करण्यात आली.
या कारवाईत अन्न निरीक्षक विजयकुमार गुमशेट्टी, एएसआय आर. एन. परगुली आणि कर्मचारी बसवराज अंबिगेर सहभागी झाले होते, अशी माहिती अन्न विभागाचे उपसंचालक विनयकुमार पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकात दिली.