विजयपूरमध्ये १५ हून अधिक घरगुती गॅस सिलिंडर जप्त
हॉटेलांवर अन्न विभागाच्या अधिकाऱ्यांची कारवाई
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
हॉटेलांमध्ये अनधिकृतपणे घरगुती गॅस सिलिंडरचा वापर होत असल्याचे माहिती मिळताच अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी हॉटेलांवर छापे टाकून १५ हून अधिक घरगुती गॅस सिलिंडर जप्त केले.
शहरातील सोलापूर रस्त्यालगत असलेल्या हॉटेलांमध्ये अनधिकृतपणे घरगुती गॅस सिलिंडर वापर होत असल्याची खात्री करून अधिकाऱ्यांनी एकूण १५ घरगुती सिलिंडर जप्त केले. तसेच, हॉटेलांमध्ये अशा प्रकारे घरगुती सिलिंडरचा वापर करणाऱ्या मालकांना इशारा देण्यात आला आहे.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार विभागाचे उपसंचालक विनयकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईत सहाय्यक संचालक अमरेश तांडूर आणि अन्न निरीक्षक विजयकुमार गुमशेट्टी यांच्यासह इतर कर्मचारी सहभागी झाले होते.
