सोन्याच्या दुकानात दरोडा टाकणारे दोन आंतरराज्यीय आरोपींना अटक
विजयपूर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
हलसंगी गावात मोटारसायकलवर येऊन बंदूक दाखवत सोन्याच्या दुकानात दरोडा टाकणाऱ्या दोन आंतरराज्यीय आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले असून लाखो रुपयांच्या किमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे हणमंत मल्लप्पा वाघोली (२८, मूळ संख गाव, सध्या जत येथे वास्तव्यास) आणि शिवराज उर्फ गौडप्पा रावसाहेब नावी (२८, सध्या पुणे येथे वास्तव्यास) अशी आहेत.
आरोपींकडून २०५ ग्रॅम सोन्याचे दागिने, १ किलो चांदी, एकूण सुमारे २२ लाख रुपये किमतीचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली एक कंट्री पिस्तूल तसेच आणखी ३ कंट्री पिस्तुल, २६ जिवंत काडतुसे, एक एअरगन आणि मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
या संदर्भात पत्रकार परिषदेत माहिती देताना जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी सांगितले की, २६ जानेवारी रोजी हलसंगी गावात ही घटना घडली होती. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी आरोपींना अटक करण्यात यश मिळवले.
चौकशीदरम्यान कर्जबाजारीपणा, चैनीची आवड आणि महागड्या जीवनशैलीच्या मोहापायी आरोपींनी हा गुन्हा केल्याचे समोर आले. सुरुवातीला सोलापूर येथे दरोडा टाकण्याचा त्यांचा बेत होता; मात्र तेथे गर्दी जास्त असल्याने सीमाभागातील हलसंगी गाव निवडून दरोडा टाकल्याचे उघड झाले.
**गोरखपूर कनेक्शन**
हलसंगी गावातील या दरोड्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. चौकशीतून आरोपींनी उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथून पिस्तुल आणल्याची माहिती समोर आली असल्याचे निंबरगी यांनी सांगितले. गुन्ह्यात वापरलेली एक कंट्री पिस्तूल आणि आणखी तीन पिस्तुल जप्त करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक रामगौडा हट्टी यांच्या नेतृत्वाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव कट्टीमनी, सुनील कांबळे, परशुराम मनगुळी, सोमेश गेज्जे आणि राकेश बगळे यांचा समावेश असलेल्या पथकाने आरोपींचा शोध लावण्यात यश मिळवले असून त्यांना बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
*७५ हजार सीसीटीव्ही बसविण्याचे लक्ष्य**
सीसीटीव्ही कॅमेरे हे सुरक्षेचे महत्त्वाचे साधन असल्याचे सांगून निंबरगी म्हणाले की, कोट्यवधी रुपये खर्च करून घर बांधले जाते, पण सीसीटीव्ही बसविण्याकडे दुर्लक्ष केले जाते, हे योग्य नाही. जनजागृतीमुळे आतापर्यंत २५ हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. पुढे आणखी जनजागृती करून ७५ हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
ग्रामीण भागातही महत्त्वाच्या ठिकाणी तसेच घरांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी ग्रामपंचायतींसोबत समन्वय साधला जात आहे, असे त्यांनी सांगितले.
तसेच, कोणीही संशयास्पद व्यक्ती चेहरा झाकून, हेल्मेट व ग्लोव्ह्ज घालून फिरताना आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.
