चोरीप्रकरणी आरोपीस अटक
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
जिल्ह्यातील निडगुंदी येथे ट्रकमधून लाखो रुपयांचा माल असलेले बॉक्स चोरी केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून, सुमारे ३० लाख रुपये किमतीच्या विविध वस्तू असलेले ५२५ बॉक्स जप्त केले आहेत.
बागलकोट जिल्ह्यातील होसूर क्रॉस येथील रहिवासी आणि मूळचा राजस्थानचा असलेला वालाराम तेजाराम (वय ३२) याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील इतर काही आरोपी फरार आहेत.
दि. २० रोजी पाँडिचेरीहून महाराष्ट्रातील भिवंडी येथे गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडच्या विविध वस्तूंचे १३२३ बॉक्स घेऊन शुभम ट्रान्सपोर्टशी संबंधित कंटेनर ट्रक रवाना झाला होता. त्यापैकी ५२५ बॉक्स आलमट्टी येथे चोरीला गेल्याबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा पोलिस विभागाने आरोपींचा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, एएसपी रामनगौडा हट्टी, बसवनबागेवाडी विभागाचे डीवायएसपी बल्लप्पा नंदगावी यांच्या मार्गदर्शनाखाली निडगुंदीचे सीपीआय शरणगौडा गौडर तसेच पीएसआय शिवानंद पाटील आणि ए. के. सोन्नद यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक नेमले होते.
आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात यश मिळाल्याबद्दल या पथकाच्या कामाचे कौतुक करत जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी बक्षीस जाहीर केले आहे.
