काँग्रेसने गांधीजींच्या विचार, तत्व सिद्धांताचा कधीच पालन केले नाही- खा. रमेश जिगजिनगी
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस पक्ष विसर्जित करावा, असे महात्मा गांधींनी सांगितले होते. मात्र काँग्रेसने गांधीजींच्या विचार, तत्व सिद्धांताचे कधीच पालन केले नाही. गांधीजींचे एकही स्वप्न काँग्रेसने पूर्ण केलेले नाही. शिस्तहीन पद्धतीने अंगी बनियन-चड्डी घालणाऱ्या मुलाकडून काँग्रेसचे नेतृत्व कोण स्वीकारेल? असा सवाल उपस्थित करत खासदार रमेश जिगजिणगी यांनी काँग्रेस पक्षावर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आणि हा पक्ष पूर्णपणे नष्ट होईल, असे भाकीत केले.
भाजपने मनरेगा योजनेचे नाव बदलून गांधीजींच्या विचारांना बाजूला सारले, असा काँग्रेस नेत्यांचा आरोप फेटाळून लावत जिगजिणगी यांनी अनेक प्रश्न उपस्थित करत काँग्रेसवर जोरदार टीका केली.
पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महान व्यक्तिमत्त्वांचा अपमान काँग्रेसनेच केला आहे. सध्या केंद्रात सत्तारूढ असलेला भाजप उत्तम प्रशासन देत आहे. त्यामुळेच या योजनांबाबत एआयसीसी अध्यक्ष खर्गे यांना पोटदुखी होत आहे, असा आरोप त्यांनी केला.
देशात मनरेगा योजनेला पूर्वी कोणताही ठोस आराखडा नव्हता. आता ‘राम’ नावाने महात्मा गांधींना सन्मान देत जनतेला सुविधा देण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले आहे. केंद्र आणि राज्यांच्या सहकार्याने ही योजना राबवली जात आहे. पूर्वी राज्य सरकारे निधी देत नव्हती, आता ६०:४० निधी वाटप सक्तीचे करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. आधी योजनेत योग्य लेखाजोखा नव्हता, बनावट नावे दाखवून निधीचा गैरवापर केला जात होता. आता याला आळा बसेल, असेही ते म्हणाले.
राज्य सरकारांच्या सहकार्याअभावी शिस्तबद्ध नियम लागू करण्यात आले असून, महात्मा गांधींच्या स्वप्नानुसार कायद्यात सुधारणा करण्यात आल्या आहेत, असे जिगजिणगी यांनी स्पष्ट केले.
**दिवा पेटल्यावर उजेड होतो…**
काँग्रेस पक्षाचा सर्वनाश होईल, असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावरही टीका केली.
विजयपूर जिल्हाला ८०० कोटी देण्याचे आश्वासन दिले, मात्र प्रत्यक्षात कोणताही निधी दिला नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.
सिद्धरामय्या आमच्यासोबत असताना चांगले होते…**
सिद्धरामय्या माझे जवळचे मित्र होते. आमच्यासोबत असताना ते चांगले होते, पण काँग्रेसमध्ये गेल्यानंतर ते फारच वाईट झाले, अशी टीका जिगजिणगी यांनी केली. काँग्रेसमध्ये अंतर्गत भांडणे, गटबाजी सुरू असून कोणता निर्णय घ्यायचा हे त्यांनाच कळत नाही. ते स्वतः टिकतील की नाही, याचीही त्यांना खात्री नाही. याबाबत प्रभारी मंत्री व काँग्रेस नेत्यांना विचारा, मला सर्व माहिती आहे, असेही ते म्हणाले.
विजयपूरमधील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आंदोलनाला आपण पाठिंबा दिला होता. आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.
**कायद्याबाबत काँग्रेसला अपुरी माहिती**
भाजप एस.टी. मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रवी वग्गे म्हणाले की, मनरेगा योजनेत पूर्वी केवळ १०० दिवसांचे काम होते, आता ते १२५ दिवसांपर्यंत वाढवण्यात आले आहे. याच कारणामुळे काँग्रेस विरोध करत आहे का, असा संशय वाटतो. मजुरी वेळेत, ठराविक कालावधीत देणे आवश्यक आहे. योजनेतील भ्रष्टाचाराचा उल्लेख यापूर्वी कॅग अहवालात झाला होता. आता केंद्र सरकार योजना पारदर्शक करण्यासाठी पुढाकार घेत आहे, असे ते म्हणाले.
कायद्याची योग्य समज न ठेवता काँग्रेस विरोध करत आहे. केंद्राकडून येणारा निधी राज्य सरकारांकडून गैरवापरला जात होता. आता त्याला आळा बसत असल्याने भाजपेतर राज्य सरकारे विरोध करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.
या पत्रकार परिषदेला भाजप जिल्हाध्यक्ष गुरुलिंगप्पा अंगडी, जिल्हा सरचिटणीस ईराण्णा रावूर, भाजप किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष बालराज रेड्डी, जिल्हा परिषद माजी सदस्य साबू माश्याळ आणि माध्यम प्रमुख विजय जोशी उपस्थित होते.
