४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा
ज्युनियर नॅशनल खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांसह यजमान कर्नाटक व ओडिशाची विजयी गर्जना; फायनलमध्ये धडक!
महाराष्ट्राचे वाघ आणि रणरागिणींची अंतिम सामन्याकडे कूच!
बेंगळुरू, दि. ४ जाने. (क्री. प्र.) : गुंजूरच्या मैदानावर खो-खोचा अक्षरशः महासंग्राम रंगला आणि त्यात मराठी ताकदीचा डंका पुन्हा एकदा वाजला! भारतीय खो-खो महासंघाच्या मान्यतेने व कर्नाटक खो-खो असोसिएशनच्या यजमानपदाखाली आयोजित ४४ वी कुमार–मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा (२०२५–२६) आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. उपांत्य फेरीतील थरारक लढतींमध्ये मुलांच्या गटात महाराष्ट्र व यजमान कर्नाटक, तर मुलींच्या गटात महाराष्ट्र व ओडिशा या संघांनी प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करत दिमाखात अंतिम फेरी गाठली. चपळाई, ताकद, डावपेच आणि जिद्दीचे अद्भुत दर्शन घडवत या सामन्यांनी क्रीडाप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडले असून, आता संपूर्ण देशाचे लक्ष महाअंतिम सामन्यांकडे लागले आहे.
महाराष्ट्राची पंजाबवर ‘डावाने’ मात; महाराष्ट्राचा मैदानात भांगडा!
मुलींच्या उपांत्य फेरीत महाराष्ट्र विरुद्ध पंजाब हा सामना एकतर्फी ठरला. मध्यंतराला २६–८ अशी भक्कम आघाडी घेत महाराष्ट्राने अखेर २८–१४ असा १४ गुण आणि एक डाव राखून विजय मिळवला. महाराष्ट्राकडून स्नेहा लामकाणे (१.५० मि. संरक्षण, ८ गुण) हिने आक्रमक खेळ करत चमक दाखवली; श्रावणी तामखाडे (३.२० मि. संरक्षण), धनश्री कंक (३ मि. नाबाद संरक्षण, २ गुण), सानिका चाफे (३ मि. संरक्षण, २ गुण) आणि श्वेता नवले (२ मि. संरक्षण, २ गुण) यांनी विजयात मोलाची भर घातली. पंजाबकडून जसदीप कौर (१.२० मि. संरक्षण, ४ गुण), गुड्डी (२ मि.) व प्रीती (१.१५ मि. संरक्षण) यांनी प्रयत्न केले; मात्र ते अपुरे ठरले.
हाय-व्होल्टेज थरार! महाराष्ट्र–कोल्हापूर अटीतटीची लढत
मुलांच्या उपांत्य सामन्यात महाराष्ट्र विरुद्ध कोल्हापूर हा सामना प्रेक्षकांच्या श्वास रोखून धरणारा ठरला. मध्यंतराला कोल्हापूर १७–१६ असा एका गुणाने पुढे होता; मात्र उत्तरार्धात महाराष्ट्राने जोरदार मुसंडी मारत ३३–३१ असा २ गुणांनी विजय खेचून आणला. महाराष्ट्राकडून जितेंद्र वसावे (२.२० मि. संरक्षण, ६ गुण), राज जाधव (१ मि., १.४० मि. संरक्षण, ६ गुण), सोत्या वळवी (१.४० व १.१० मि. संरक्षण, ४ गुण) आणि आशिष गौतम (१.४० मि. संरक्षण, २ गुण) यांनी निर्णायक भूमिका बजावली. कोल्हापूरकडून शरद घाटगे (१.४० व १.३० मि. संरक्षण, ८ गुण), उदय पडळकर (१.२० मि. संरक्षण, ४ गुण) व श्रावण वाडेकर (२ मि., १.१० मि. संरक्षण, २ गुण) यांनी झुंजार लढत दिली; मात्र नशीब महाराष्ट्राच्या बाजूने राहिले.
ओडिशाची कोल्हापूरवर निसटती मात; फायनलमध्ये धडक
मुलींच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत ओडिशाने कोल्हापूरवर २९–२७ अशी २ गुणांनी निसटती मात करत अंतिम फेरी गाठली. अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या या सामन्यात ओडिशाने ४० सेकंद शिल्लक राखत विजय निश्चित केला. ओडिशाकडून अर्चना प्रधान (२.३० व २ मि. संरक्षण, २ गुण), सुभाश्री (१.१० मि. संरक्षण, ६ गुण), लीसाराणी आर (१.३० व १.४० मि. संरक्षण), देबस्मिता दास (१ मि., १.५० मि. संरक्षण, ४ गुण) आणि के. रम्या (१.१० मि. संरक्षण, ६ गुण) यांनी चमकदार कामगिरी केली. कोल्हापूरकडून श्रावणी पाटील (१.२० व १.३० मि. संरक्षण, ४ गुण), अमृता पाटील (१.३० व १ मि. संरक्षण, ८ गुण), चैत्राली वाडेकर (१.३० व १ मि. संरक्षण, ४ गुण) आणि सई सावंत (१.५० व २ मि. संरक्षण) यांनी जोरदार प्रतिकार केला.
घरच्या मैदानावर कर्नाटकचा दबदबा; मध्य भारतवर मात
मुलांच्या उपांत्य फेरीत यजमान कर्नाटकने मध्य भारत संघाचा ३३–२० असा १३ गुण आणि एक डाव राखून पराभव केला. मध्यंतराला कर्नाटक ३१–१० अशी मोठी आघाडी घेऊन पुढे होते. कर्नाटककडून अनिकेत (२.१० व ३.५० मि. संरक्षण, २ गुण), योगेश पवार (२.३० मि. संरक्षण, ६ गुण), विजय बी. (३ मि. संरक्षण, २ गुण), तसेच मल्लिकार्जुन व इब्राहिम (प्रत्येकी ४ गुण) यांनी विजय साकारला. मध्य भारताकडून चैतन्य इंगोले व आदर्श वानखेडे (प्रत्येकी ४ गुण), तर ईशांत करोसिया (१.५० मि. संरक्षण) यांनी प्रयत्न केले; मात्र ते अपुरे ठरले.
महाअंतिम लढतीसाठी महाराष्ट्र सज्ज!
आता स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात मुलांच्या गटात महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक आणि मुलींच्या गटात महाराष्ट्र विरुद्ध ओडिशा हे महाअंतिम सामने रंगणार आहेत. खो-खो प्रेमींना थरार, कौशल्य आणि जिद्दीचा सर्वोच्च अनुभव देणारे हे सामने क्रीडाइतिहासात नवी भर घालतील, यात शंका नाही!
उपांत्यपूर्व लढती :
तत्पूर्वी उपांत्यपूर्व सामन्यात महाराष्ट्राच्या मुलांनी प. बंगालवर ३६-२८ असा ७.१० मि. राखून ८ गुणांनी मात केली तर महाराष्ट्राच्या मुलींनी विदर्भाचा ३०-११ असा एक डाव राखून १९ गुणांनी धुव्वा उडवला.
