आपल्या सांस्कृतिक वैभवाचा प्रसार जगभर होण्याच्या दृष्टीने कलाधारा कार्यक्रम*-*डॉ. *सुधा मूर्ती
विजयपूर/प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
आपल्या सांस्कृतिक वैभवाचा प्रसार जगभर व्हायला हवा. या दृष्टीने पहिल्या टप्प्यात *‘कलाधारा’* नावाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, नागरिकांचा सहकार्य लाभल्यास हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित करण्याची योजना असल्याचे राज्यसभा सदस्या व मूर्ती ट्रस्टच्या अध्यक्षा डॉ. सुधा मूर्ती यांनी सांगितले.
विजयपूर येथील पत्रकार भवनात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना त्या म्हणाल्या की, सांस्कृतिक भव्यतेचा प्रसार करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कर्नाटक पर्यटन विभाग, पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग आणि भारतीय विद्या भवन यांच्या सहकार्याने हा विशेष कार्यक्रम होत आहे. हिंदुस्थानी, कर्नाटकी संगीत, कथ्थक आदी विविध कलाप्रकारांची रसग्रहणाची मेजवानी दोन दिवस चालणार आहे. यंदाच्या कार्यक्रमाच्या यशानंतर पुढील वर्षीही तो नियमितपणे आयोजित केला जाईल. जिल्ह्याच्या सांस्कृतिक विकासाच्या एकमेव उद्देशाने ही महत्त्वाची कार्ययोजना आखण्यात आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
४ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता कर्नाटक संगीत वाद्य मैफल होणार असून,
डी. बालकृष्ण (वीणा), आधिती कृष्ण प्रकाश (व्हायोलिन), व्ही. वंशीधर (बासरी), अनिरुद्ध भट (मृदंग) आणि भाग्यलक्ष्मी भट (मोरसिंग) हे कलाकार आपली कला सादर करणार आहेत. त्याच दिवशी सायंकाळी ७ वाजता विदुषी मिथुन श्याम व सहकलाकारांचे भरतनाट्यम सादरीकरण होईल. नादम् नृत्य पथकाकडून *‘कथक की खनक’* हा विशेष कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. तसेच प्रसिद्ध कलाकार पोन्नप्पा कडेमणी यांच्या नेतृत्वाखाली कला शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
हळेबीडू कदंब उत्सव, हम्पी उत्सव यांसारखे देश-विदेशातील अनेक उत्सव पाहिल्याचा उल्लेख करत डॉ. सुधा मूर्ती म्हणाल्या की, कर्नाटकातील अनेक जिल्हे सांस्कृतिकदृष्ट्या अतिशय समृद्ध आहेत. विजयपूर जिल्ह्यात विमानतळ झाल्यास सांस्कृतिक व पर्यटनाच्या दृष्टीने मोठा फायदा होईल. याबाबत त्यांनी राज्यसभेतही आवाज उठवला आहे. बेंगळुरू, हैदराबाद, नवी दिल्ली येथून लोक सहजपणे येथे येऊन या भागाचे सौंदर्य अनुभवू शकतील, असे त्यांनी नमूद केले.
### नवरसपुरातही उत्सव होऊ द्या
नवरसपुर उत्सवासाठी सरकारने अनुदान द्यावे, त्यासाठी स्वतःही मदत करण्यास तयार असल्याची घोषणा डॉ. सुधा मूर्ती यांनी केली. पूरक बस सुविधा, परिसर स्वच्छता आदी जबाबदाऱ्या विविध संघटनांनी स्वीकारल्यास पूर्ण प्रमाणात आर्थिक सहकार्य देण्याची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावर्षी नवरसपुर उत्सव घेण्याबाबत मंत्री डॉ. एम.बी. पाटील यांनी आश्वासन दिले असून, यंदा शक्य न झाल्यास पुढील वर्षी हा उत्सव मूर्ती ट्रस्टतर्फेच आयोजित करण्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कानिप जिल्हाध्यक्ष अशोक यडहळ्ळी यांनी सांगितले की, विजयपूर ही अनेक ऐतिहासिक स्मारकांची भूमी आहे. येथून बदामी, पट्टदकल, हळेबीडू यांसारख्या पर्यटनस्थळांकडे जाणारा मार्ग जातो. त्यामुळे एक विशेष *टुरिझम वे* विकसित केल्यास सोयीस्कर ठरेल.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार *गोपाल नायक, वासुदेव हेरकल, पर्यटन विभागाचे समन्वयक अनिल, भारतीय विद्या भवनच्या नागलक्ष्मी, तसेच पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे अधिकारी रमेश मूळिमणी उपस्थित होते.
