संस्कारयुक्त शिक्षणामुळे सुसंस्कृत समाज निर्माण होऊ शकतो - श्री बोधले महाराज
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
संस्कारयुक्त शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नसून मुलांमध्ये नैतिक मूल्ये, शिस्त आदर, माणुसकी रुजवणारी प्रक्रिया असते, संस्कारयुक्त शिक्षणामुळे सुसंस्कृत समाज निर्माण होऊ शकतो असे ह. भ. प. प्रभाकर बुवा बोधले महाराज यांनी सांगितले.
गुरुवर्य श्री प्रभाकर बुवा बोधले महाराज यांना आध्यात्मिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सेवारत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल भावसार क्षत्रिय समाजाच्यावतीने शहरातील भावसार सांस्कृतिक भवनात आयोजित कार्यक्रमात बोलताना ते पुढे म्हणाले, संस्कार विना शिक्षणामुळे समाज विखुरला जात आहे, मुले आई वडिलांपासून दूर होत आहेत. मुलींच्या जास्त शिक्षण, मुले व्यवसाय धंदात त्यामुळे विवाह समस्या निर्माण झाली आहे. उच्च शिक्षण नसेल तरीसुद्धा सुखी जीवन, ससांर होऊ शकतो असा कानमंत्र महाराजांनी दिला.
याप्रसंगी बोलताना भावसार समाजाचे अध्यक्ष राजेश देवगिरी म्हणाले, आधुनिक काळात गुरुकुल पद्धती बदलली असली तरी गुरु शिष्याचे नाते संपलेले नाही आजही शाळा, महाविद्यालये बरोबरच समाजामध्ये गुरु शिष्य हे नाते वेगळ्या स्वरूपात अस्तित्वात आहे. तांत्रिक शिक्षणासोबतच आजही संस्कार व मुल्ये मिळवण्यासाठी गुरुची आवश्यकता आहे असे सांगून ते पुढे म्हणाले, शाळा महाविद्यालय सुट्टीच्या कालावधीत श्री बोधले महाराज मार्गदर्शनाखाली आठ दिवसीय बाल संस्कार वर्ग घेण्यात येणार असल्याचे सांगितले
या प्रसंगी बोलताना समाजाचे सेक्रेटरी व पत्रकार दिपक शिंत्रे यांनी, ज्येष्ठ संत, समाज सुधारक माणकोजी महाराज यांना पंढरपूरात विठ्ठलांने साक्षात्कार देऊन बोध दिल्यामुळे बोधले हे नाव मिळाले, संत माणकोजी बोधले महाराजांना इतिहासातील अनेक महान व्यक्तिनी त्यांना गुरुस्थानी मानले होते. अशा महान संताचे १० वंशज श्री प्रभाकर बुवा बोधले महाराज हे आपल्या समाजास गुरुस्थानी लाभले आहेत हे आपले भाग्यच असल्याचे सांगितले.
या प्रसंगी मिलन मिरजकर, अशोक वाय मिरजकर, उपाध्यक्ष विजय नवले, महिला मंडळाच्या गौरव अध्यक्षा सौ. पद्माताई इजंतकर, अध्यक्षा सौ. नंदा पुकाळे यांच्यासह पंच मंडळाचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. राजश्री हिरासकर यांनी केले.
