आलमट्टीत फेब्रुवारीत अम्युझमेंट वॉटर पार्कचे उद्घाटन : मंत्री शिवानंद पाटील
*मंत्रांच्या हस्ते नौकाविहारास शुभारंभ*
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
फेब्रुवारी महिन्यातच आलमट्टी अम्युझमेंट पार्कचे उद्घाटन करून पर्यटकांसाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. त्याचबरोबर वॉटर स्पोर्ट्स उपक्रमांनाही प्राधान्य दिले जाईल, असे वस्त्रोद्योग, एपीएमसी व साखर मंत्री श्री. शिवानंद पाटील यांनी सांगितले.
आलमट्टी येथील रॉक गार्डनमधील सिल्व्हर लेक येथे शनिवारी नौकाविहारास पुन्हा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते.
गेल्या १० वर्षांपासून बंद असलेल्या नौकाविहारातील सर्व अडथळे दूर करून तो पुन्हा सुरू करण्यात आला असून यामुळे पर्यटकांना मोठा लाभ होणार आहे. यासाठी प्रति व्यक्ती ५० ते १०० रुपयांपर्यंत प्रवेश शुल्क ठेवण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
नोव्हेंबर ते जून या कालावधीत हजारो पर्यटक आलमट्टीला भेट देतात. म्हैसूरच्या केआरएसनंतर उत्तर कर्नाटकात आलमट्टी हे प्रमुख पर्यटनस्थळ आहे, असे त्यांनी नमूद केले. आलमट्टी हे केवळ मनोरंजनाचे ठिकाण नसून येथे विज्ञान उद्यानही असून शैक्षणिक पर्यटनासाठीही ते उपयुक्त ठरणार आहे. पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी आणखी उपक्रम सुरू करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
आलमट्टी येथे मत्स्य व्यवसाय महाविद्यालय सुरू करून मच्छिमारांना प्रशिक्षण देण्याची घोषणा २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात करण्यात आली असून त्यास मंजुरी देण्यात आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोटी वृक्ष अभियानांतर्गत दरवर्षी आलमट्टीतील विविध नर्सरींमध्ये १० लाख रोपे तयार करण्याचे काम मागील दोन वर्षांपासून स्थगित झाले आहे. सध्या प्रादेशिक व सामाजिक वनीकरण विभागामार्फत रोपे तयार करून वितरित केली जात आहेत. आलमट्टी केबीजेएनएल वन विभागामार्फतही ही प्रक्रिया सुरू करण्यासाठी आपण कटिबद्ध असून त्यासाठी आवश्यक पावले उचलली जातील, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.
यावेळी माजी मंत्री एस. आर. पाटील, मुख्य अभियंता डी. बसवराज, अधीक्षक अभियंता अभिमन्यू, तारासिंग दोडमणी, डीएफओ एन. के. बागायत, महेश पाटील, शंकरय्या मठपती यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
