Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

धाराशिव, ठाणे, पुणे आणि साताऱ्याची डरकाळी

Responsive Ad Here

 ३९ वी किशोर-किशोरी राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धा


किशोर गटात धाराशिव वि.सातारा आणि ठाणे वि. पुणे तर


किशोरी गटात सोलापूर वि. ठाणे आणि धाराशिव वि. सांगली उपांत्य फेरीत टक्कर देणार


धाराशिव, ठाणे, पुणे आणि साताऱ्याची डरकाळी!








मुंबई  (क्री. प्र.) -बाळ तोरसकर 

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने तसेच मुंबई खो-खो असोसिएशन व श्री समर्थ व्यायाम मंदिर, दादर यांच्या संयुक्त विद्यमाने ३९ वी किशोर व किशोरी (सब ज्युनिअर - १४ वर्षाखालील) राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ, सहकारनगर, वडाळा, मुंबई येथे दणक्यात सुरु  असून या स्पर्धेने आता उत्कंठेच्या शिखरावर प्रवेश केला आहे! मातीतील या अस्सल खेळाचा वेग, चपळाई आणि श्वास रोखून धरायला लावणाऱ्या खेळाने प्रेक्षकांचे डोळे दिपवले आहेत. साखळी आणि उपांत्यपूर्व फेरीतील अटीतटीच्या संघर्षानंतर आता विजेतेपदाच्या दावेदारांमध्ये खऱ्या अर्थाने 'कांटे की टक्कर' पाहायला मिळणार आहे. किशोर गटात धाराशिव विरुद्ध सातारा आणि ठाणे विरुद्ध पुणे, तर किशोरी गटात सोलापूर विरुद्ध ठाणे आणि धाराशिव विरुद्ध सांगली अशा अंगावर शहारे आणणाऱ्या लढती आता उपांत्य फेरीत रंगणार आहेत.


 


धाराशिवचा दुहेरी धमाका: नाशिक आणि अहिल्यानगरचा धुव्वा!


धाराशिवच्या किशोर आणि किशोरी दोन्ही संघांनी मैदानावर अक्षरशः वादळ निर्माण केले. किशोरी गटात धाराशिवने नाशिकचा ३४-१५ असा १९ गुणांनी धुव्वा उडवला. धाराशिवच्या आरोही पाटील (नाबाद २.२० मि. व २.५० मि. संरक्षण, ४ गुण) आणि ईश्वरी सुतार (२ मि. संरक्षण, ६ गुण) यांनी विजयाचा पाया रचला; तर नाशिकच्या गायत्री पेंढार (२.१० मि. व १.४० मि. संरक्षण, २ गुण) आणि संभावी शिंदे (१.३० मि. व १.४० मि. संरक्षण) यांचे प्रयत्न अपुरे पडले. किशोरांच्या गटात धाराशिवने अहिल्यानगरला एक डाव ७ गुणांनी (२५-१८) लोळवले. धाराशिवच्या प्रफुल वसावे (३.१० मि. संरक्षण, २ गुण) आणि सुरज काकडे (१ मि. नाबाद व ०.४० मि. संरक्षण, ८ गुण) यांनी जबरदस्त खेळ केला, तर अहिल्यानगरकडून सुमित राठोड (१ मि. संरक्षण, ४ गुण) एकाकी लढला.


 


पुण्याची सांगलीवर मात; सोहम आणि कर्तव्यची 'रॉयल' कामगिरी


किशोर गटात पुणे आणि सांगली यांच्यात झालेला सामना अत्यंत चुरशीचा ठरला. पुण्याच्या संघाने सुरुवातीपासूनच सांगलीवर दबाव निर्माण केला आणि २८-२० अशा फरकाने ५ गुणांनी विजय साकारला. पुण्याच्या विजयात सोहम देशमुख (३.३० मि. संरक्षण, ६ गुण) आणि कर्तव्य दांडेकर (१.२० मि. नाबाद व १.१० मि. संरक्षण, ४ गुण) यांनी मोलाची भूमिका बजावली. सांगलीकडून शुभम माने (२.४० मि. नाबाद व २ मि. संरक्षण, ६ गुण) आणि सोहम पाडले (१ मि. संरक्षण, २ गुण) यांनी दिलेली झुंज कौतुकास्पद ठरली, मात्र पुण्याने आपले वर्चस्व कायम राखले.


 


साताऱ्याचा रत्नागिरीवर 'रेकॉर्डब्रेक' विजय; वरद पोळ चमकला


किशोर गटात साताऱ्याने रत्नागिरीचा अक्षरशः पालापाचोळा केला. साताऱ्याने सामन्याच्या सुरुवातीपासूनच इतकी आक्रमक पवित्रा घेतला की मध्यंतरापर्यंतच ३५-०२ अशी मोठी आघाडी घेतली होती. अखेर साताऱ्याने एक डाव २९ गुणांनी (३७-०८) हा सामना खिशात घातला. साताऱ्याच्या वरद पोळ (५.५० मि. संरक्षण, ८ गुण) आणि आयुष्य पांगरे (१.३० मि. व १.१० मि. नाबाद संरक्षण, ६ गुण) यांच्या अष्टपैलू खेळापुढे रत्नागिरीचा शाश्वत डोरलेकर (१ मि. संरक्षण) हतबल ठरला.


 


सोलापूरची जालन्याला 'धोबीपछाड'; किशोरी गटात सोलापूर सुसाट


किशोरी गटामध्ये सोलापूरने जालन्याला सावरून घेण्याची संधीच दिली नाही. धारदार आक्रमण आणि अभेद्य संरक्षणाच्या जोरावर सोलापूरने २८-०५ असा एक डाव २३ गुणांनी दणदणीत विजय मिळवला. सोलापूरच्या रिया चव्हाण (६.३० मि. संरक्षण, ४ गुण) आणि श्रेया यलमार (५.१० मि. संरक्षण) यांनी मैदानावर आपली छाप सोडली. जालना संघाकडून समीक्षा बिन्नीवाले (१ मि. संरक्षण, २ गुण) आणि पायल घुशिंगे (२.१० मि. संरक्षण) यांनी शर्थीचे प्रयत्न केले, पण सोलापूरच्या वेगापुढे त्यांचा निभाव लागला नाही.


 


ठाण्याचा डबल बार; पुणे आणि सोलापूरला नमवून उपांत्य फेरीत धडक


ठाण्याच्या किशोर आणि किशोरी दोन्ही संघांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. किशोरी गटात ठाण्याने पुण्याचा २७-१९ असा ८ गुणांनी पराभव केला, ज्यात गौरी रोडे (२.२० मि. संरक्षण, ८ गुण) आणि श्रावणी मोरे (२.२० मि. संरक्षण, ४ गुण) यांनी अप्रतिम खेळ केला; पुण्याच्या आराध्या गीते (१.२५ मि., ६ गुण), अपर्णा वर्धे (२.२० मि., २ गुण) आणि पूर्वा मोरे (१ मि. व १.४० मि., २ गुण) यांची लढत अपयशी ठरली. दुसरीकडे, किशोर गटात ठाण्याने सोलापूरचा १.५० मि. राखून ८ गुणांनी धुव्वा उडवला. ठाण्याकडून आरु गटेल (२ मि. नाबाद व १.२० मि. संरक्षण), गणेश राठोड (नाबाद १.३० मि. व १.१० मि. संरक्षण, ४ गुण) आणि आर्यन मुळीक (१.३० मि. संरक्षण, ४ गुण) यांनी चमक दाखवली, तर सोलापूरच्या यश कदम (१.१० मि. संरक्षण, ८ गुण) आणि सार्थक (१.१५ मि. व नाबाद १ मि. संरक्षण, २ गुण) यांचा प्रतिकार कमी पडला.