५१ वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा
पहिल्याच दिवशी यजमान अहिल्यानगरचा दमदार विजय!
स्पर्धेत ठाणे, धाराशिव, सोलापूर, मुंबई उपनगर, रत्नागिरी चमकले
मैथिली, समृद्धी, कल्याणी, अक्षरा ठरल्या आकर्षणाचा केंद्रबिंदू
अहिल्यानगर (क्री. प्र.) - बाळ तोरसकर
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने श्री बाणेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बुन्हाणनगर येथे सुरू झालेल्या ५१ वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी साखळी सामन्यांत दमदार कामगिरीची आतषबाजी पाहायला मिळाली. मुलांमध्ये यजमान अहिल्यानगर तर मुलींच्या गटात मुंबई उपनगर यांनी प्रभावी विजयांसह पुढे चाल केली.
मा. श्री. अक्षयदादा शिवाजीराव कर्डिले युवा प्रतिष्ठाण, विश्वंभरा प्रतिष्ठाण बुऱ्हाणनगर व बाणेश्वर क्रीडा मंडळ बुऱ्हाणनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत २४ जिल्ह्यांतील मुला-मुलींचे संघ सहभागासाठी उपस्थित असून ४ ते ७ डिसेंबरपर्यंत सामने रंगणार आहेत.
मुलींच्या गटात बलाढ्य धाराशीवने परभणीवर १ डाव ३ गुणांनी विजय संपादन केला. धाराशिव संघाकडून मैथिलीने ४ मिनिट १० सेकंद संरक्षण केले. सांगलीने बीडवर १ डाव ६ गुणांनी विजय मिळवला. सांगली संघाकडून स्वप्नाली तामखडे आणि श्रेया तामखडे यांनी प्रत्येकी ३ मिनिट संरक्षण केले. सोलापूरने लातूरवर १ डाव ९ गुण राखत विजय मिळवला. सोलापूर कडून समृद्धी सुरवसेने नाबाद ३.२० मि. पळतीचा खेळ केला तर कल्याणी लांबकाणेने ४ मिनिट ४० सेकंद पळतीचा खेळ करून आक्रमणात ४ गडी बाद केले. ठाणे संघाने सिंधुदुर्गवर २४ गुणांनी विजय संपादन केला. ठाणे संघाकडून दीक्षा काटेकर हे ३.२० मि. तर प्रणिती जगदाळे यांनी ३ मिनिट संरक्षण केले. अक्षरा भोसलेने आक्रमणामध्ये ७ गडी बाद केले. मुंबई उपनगर संघाने नांदेड वर १ डाव ६ गुणांनी विजय मिळवला. उपनगर संघाकडून दिव्या चव्हाणने ३ मिनिटे तर दिव्या गायकवाड ने ४ मिनिट १० सेकंद पळतीचा खेळ केला. तर रत्नागिरीने जळगाव संघावर १ डाव ९ गुणांनी (१६-७) मोठा विजय मिळवला.
पहिल्या दिवशी झालेल्या किशोरांच्या (मुलांच्या) गटातील सामन्यात धाराशिवने १ डाव ६ गुणांनी पालघरवर विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात सांगली संघाने छत्रपती संभाजी नगरचा १ डाव ६ गुणांनी पराभव केला. सोलापूरने सिंधुदुर्गवर १ डाव २१ गुणांनी विजय संपादन केला. पुणे संघाने लातूरचा १ डाव १६ गुणांनी पराभव केला. यजमान अहिल्यानगर संघाने परभणीवर १ डाव ९ गुणांनी विजय मिळवला. तर बलाढ्य ठाणे संघाने हिंगोलीवर १ डाव १८ गुणांनी मात केली. नाशिकच्या संघाने जळगाव वर १ डाव ९ गुणांनी विजय मिळवला.
