भाजपचे खासदार रमेश जिगजिणगी मुख्यमंत्री झाले तर आम्हाला आनंदच - एस.एम.पाटील
विजयपूर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
भाजपाचे ज्येष्ठ खासदार रमेश जिगजिणगी यांनी आधी आपल्या पक्षाकडून स्वतःला मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करून घ्यावे; ते मुख्यमंत्री झाले तर आम्हालाही आनंदच होईल, असे काँग्रेसचे पक्षाचे प्रवक्ते एस.एम. पाटील गणिहार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
दलित नेत्यांना मुख्यमंत्री करावे असे काँग्रेसवर टीका करण्यापूर्वी भाजपवाल्यांनी स्वतःलाच प्रश्न विचारावा. देशातील २७ हून अधिक राज्यांत भाजपाचे सरकार आहे—तेथे कुठल्याही राज्यात दलित नेत्याला मुख्यमंत्री केले आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
जिगजिणगी हे ज्येष्ठ नेते, केंद्रात मंत्रीही झाले; मग त्यांना मुख्यमंत्री का केले नाही? यापूर्वी भाजपाने तीन-तीन मुख्यमंत्री बदलले, तेव्हा दलित नेत्याला मुख्यमंत्री करण्याचा विचार का आला नाही? असा प्रश्न त्यांनी केला.
विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी टीका करावी, पण ती घटनात्मक मर्यादेत राहूनच करावी. “सरकार मेलंय, प्रेत बाहेर काढलं पाहिजे” अशा असंबद्ध भाषेचा वापर कितपत योग्य? असा सवाल त्यांनी केला. विरोधी पक्षनेते ही घटना मान्य असलेल्या पदावर आहेत; त्यांनी सरकारविषयी भारतीय संस्कृतीला न शोभणारी भाषा वापरली, असे त्यांनी सांगितले.
एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे ‘नुसते नावाचे अध्यक्ष’ आहेत, असे माजी उपमुख्यमंत्री करजोळ यांनी म्हटले आहे. जर तसे असेल, तर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा हेही फक्त नावालाच अध्यक्ष आहेत काय? सर्व अधिकार पंतप्रधानांकडे नसून भागवत यांच्या हातात केंद्रीत झाले आहेत. दलित बांधवांच्या उन्नतीसाठी काँग्रेसने राबवलेल्या कार्यक्रमामुळेच तुम्हाला सत्ता मिळाली; त्यामुळे केवळ टीकेसाठी असे विधान करू नये, असे पाटील यांनी सांगितले.
आमच्या संस्कृतीत आमदारांची खरेदी नाही; यापूर्वी शहराचे आमदार यतनाळ यांनीच “मुख्यमंत्री व्हायचे असेल तर कोट्यवधी रुपये लागतात” असे म्हटले होते—तेव्हा तुम्हाला घोडेबाजार आठवला नाही काय? असा प्रश्नही त्यांनी केला.
या पत्रकार परिषदेस नागराज लंबू, फयाज कलादगी, वसंत होनमोडे यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
