जलकुंडात पडून तीन मुलांचा मृत्यू
विजयपूर/प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
शेतात खेळत असताना चुकून शेतीतील जलकुंडात पडून तीन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना*विजयपूर तालुक्यातील मिंचनाळ टांडा येथील महादेव नगर** मध्ये घडली आहे.
मृत्यूमुखी पडलेली मुले म्हणजे – शिवम्मा राजू राठोड (वय ८), कार्तिक विश्व राठोड (वय ७) आणि स्वप्ना राजू राठोड (वय १२) होत. आपली कोवळी लेकरं गमावलेले पालक शोकाकुल अवस्थेत असून, त्यांचा आक्रोश पाहून संपूर्ण परिसरात दुःखाचे वातावरण पसरलं आहे.
मुलं महादेव नगरजवळील राठोड यांच्याच शेतात शेळ्यांसोबत खेळत होती. घरच्यांना वाटले की ती मुले तिथेच सुरक्षितपणे खेळत असतील. पण खेळता खेळता ती जलकुंडाजवळ गेली आणि चुकून त्यात पडली. पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.
दिवसभर मुले घरी न परतल्यामुळे नातेवाईकांनी शोध घेण्यास सुरू केला. संशय आल्यावर त्यांनी जलकुंडात पाहिले असता तिघांचे मृतदेह सापडले.
घटनास्थळी *विजयपूरचे तहसीलदार चेनगोंड आणि विजयपूर ग्रामीण पोलीस हजर राहून तपासणी केली.
अलीकडील काळात शेतीतील जलकुंडांमध्ये पडून होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढत चालली आहे. कायद्याप्रमाणे, अशा जलकुंडांच्या आजूबाजूला ताराचे कुंपण घालणे बंधनकारक आहे, तसेच लोकांची किंवा लहान मुलांची वावर होऊ नये याची दक्षता घेणे आवश्यक आहे.
मात्र काही शेतकरी हे नियम पाळत नाहीत आणि त्यामुळेच अशा दुर्दैवी घटना घडतात.
या घटनेनंतर जनतेतून आणि अधिकाऱ्यांकडूनही असे मत व्यक्त करण्यात येत आहे की, शेती जलकुंड असलेल्या सर्व शेतकऱ्यांनी आता तरी जागरूक होऊन जलकुंडाभोवती कुंपण किंवा संरक्षक भिंत बांधणे आवश्यक आहे.
