सरकारी रुग्णालयासमोरच महिला प्रसुती
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
सरकारी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे गरोदर महिलेला रुग्णालयासमोरच प्रसूती झाल्याची घटना विजयपूर शहरातील जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात घडली आहे. विजयपूर जिल्ह्यातील बसवनबागेवाडी तालुक्यातील मसबिनाळ गावातील कावेरी या गरोदर महिलेला प्रसूती झाली आहे.
बसवनबागेवाडीहून विजयपूर जिल्हा रुग्णालयाच्या आवारात आल्यानंतरही, रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे तिला आवारातच बाळंतपण करावं लागलं. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांविरुद्ध संताप व्यक्त केला.
सरकारकडून पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तरीसुद्धा कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारे दुर्लक्ष केल्यास गरीब रुग्णांचे आणि गरोदर महिलांचे आरोग्य बिघडल्यास जबाबदार कोण? असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे.
या प्रकरणावर जिल्हा सर्जन यांना विचारले असता, "कधी कधी अशा घटना घडतात. पण आई आणि बाळ दोघेही सुरक्षित आणि आरोग्यदायी आहेत, त्यामुळे कोणतीही चिंता करण्याची गरज नाही," असं त्यांनी स्पष्ट केलं.
एकंदरीत, विजयपूर सरकारी रुग्णालयाने अनेक सन्मान मिळवले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात रुग्णांच्या आरोग्यावर अधिक लक्ष केंद्रित करावं, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि रुग्णांनी केली आहे.