महानगरपालिकेच्या कार्यालयाभोवती बंदी आदेश लागू – जिल्हाधिकारी डॉ. आनंद के. यांचा आदेश
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
विजयपूर महानगरपालिकेच्या 22व्या कालावधी साठी महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, 11 ऑगस्ट 2025 रोजी निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी डॉ. आनंद के. यांनी विजयपूर महानगरपालिका कार्यालयाभोवती 200 मीटर परिसरात बंदी आदेश लागू करण्याचे आदेश दिले आहेत. हा आदेश 11 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लागू असेल.
या 200 मीटर परिसरात कोणत्याही प्रकारची शस्त्रे – तलवारी, बंदुका, चाकू, लाठी, दगड, स्फोटके, ज्वालाग्राही पदार्थ, किंवा शारीरिक इजा पोहोचवू शकणारी कोणतीही वस्तू घेऊन फिरण्यास सक्त मनाई आहे. अशा कोणत्याही वस्तू साठवणे, किंवा वापरणेही प्रतिबंधित आहे.
प्रतिकात्मक आकृतींची प्रदर्शनं किंवा दहन, तसेच भडकावणारे किंवा भावना भडकवणारे नारे, गाणी, घोषणा, पोस्टर्स, चित्रफीत, चिन्हे, प्रतिकृती यांचं सार्वजनिक प्रदर्शन यावरही बंदी घालण्यात आली आहे.
सार्वजनिक शिस्त आणि नैतिकतेला बाधा येईल अशा कोणत्याही प्रकारच्या कृत्यांना मनाई करण्यात आली आहे. कोणीही सार्वजनिकरित्या शस्त्रास्त्रं, स्फोटके, विनाशकारी किंवा आक्षेपार्ह वस्तू घेऊन फिरताना आढळल्यास पोलिस अधिकाऱ्यांना ती जप्त करण्याचा अधिकार असेल. आणि संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
मात्र, अंत्यसंस्कार, लग्न समारंभ आणि धार्मिक मिरवणुकांसाठी काहीशी सवलत देण्यात आली असून, अशा कार्यक्रमांसाठी शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.