राज्य पंच शिबिराने साताऱ्यात गाठला नवा टप्पा
राज्यातील आतापर्यंतच्या सर्वाधिक नोंदणीसह यशस्वी आयोजन; पंचांच्या दर्जात होणार मोठी वाढ
सातारा/ प्रतिनिधी-
महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व सातारा जिल्हा मॅच्युर खो-खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्य खो-खो पंच शिबिर यंदा साताऱ्यात अत्यंत उत्साहात पार पडले. शिबिरात ५८० नोंदणीपैकी तब्बल ४०६ पंचांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. ही राज्यातील आतापर्यंतची सर्वाधिक उपस्थिती असलेली राज्यस्तरीय खो-खो पंच प्रशिक्षण कार्यशाळा ठरली.
निर्मल हॉटेल येथे पार पडलेल्या उद्घाटन समारंभास महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस डॉ. चंद्रजीत जाधव अध्यक्षस्थानी होते. भारतीय खो-खो महासंघ व महाराष्ट्र संघटनेचे खजिनदार अॅड. गोविंद शर्मा, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, संदीप तावडे आदी मान्यवरांनी उपस्थित राहून पंचांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. तांत्रिक समिती, पंचमंडळ व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही उपस्थिती कार्यक्रमाला लाभली.
या शिबिरात पंचांना नव्या नियमांची माहिती, तांत्रिक मार्गदर्शन, प्रत्यक्ष मैदानावर येणाऱ्या समस्यांचे सादरीकरण तसेच व्हिडिओ विश्लेषण अशा आधुनिक व परिपूर्ण पद्धतींनी प्रशिक्षण देण्यात आले. डॉ. जाधव यांनी सांगितले की, "विश्वचषक स्पर्धेनंतर महाराष्ट्राच्या पंचांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे व परिणामकारक काम करणारे बनवण्यासाठी हे शिबिर अत्यंत महत्त्वाचे ठरेल."
प्रशिक्षक मंडळात प्रशांत पाटणकर, सुधाकर राऊळ, नरेंद्र कुंदर, नागनाथ गजमल यांचा मोलाचा सहभाग राहिला तसेच यांपंच व तांत्रिक मंडळाच्या सदस्यांनी सुध्दा मोलाचे मार्गदर्शन केले. या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने पंचांचा आत्मविश्वास आणि निर्णयक्षमता अधिक बळकट झाली. व्हिडिओ ओडीओ सादरीकरणामुळे प्रशिक्षण अधिक प्रभावी ठरले.
कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन सातारा जिल्हा मॅच्युर खो-खो असोसिएशनतर्फे करण्यात आले. कार्याध्यक्ष मनोहर यादव यांनी प्रास्ताविक केले. सरचिटणीस महेंद्रकुमार गाढवे यांनी आभार मानले तर सूत्रसंचालन वसुंधरा पवार-कदम यांनी केले. खजिनदार प्रशांत कदम, पंचमंडळ अध्यक्ष अनिकेत मोरे, सदस्य प्रसाद गुजर, सुमित निकम यांचाही संयोजनात सक्रिय सहभाग होता. या शिबिराला सातारा जिल्हा क्रीडा कार्यालयाचे विशेष सहकार्य लाभले. सातारा जिल्हा मॅच्युर खो-खो असोसिएशनने शिबिराततील सर्वांची निवास व भोजन व्यवस्था सुध्दा अप्रतिम केली होती.
साताऱ्यात पार पडलेले हे पंच शिबिर केवळ संख्यात्मकदृष्ट्या नव्हे तर गुणवत्तेच्या दृष्टीनेही ऐतिहासिक ठरले. आगामी स्पर्धांमध्ये या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन महाराष्ट्रातील पंच नवे उच्चांक गाठतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.