Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

हिमाचल प्रदेशात पावसाचा हाहाकार; ढगफुटीमुळे सर्वत्र विध्वंस; 37 नागरिकांचा बळी, 400 कोटी रूपयांच्या मालमत्तेचं नुकसान

Responsive Ad Here



हिमाचल प्रदेशात पावसाचा हाहाकार; ढगफुटीमुळे सर्वत्र विध्वंस; 37 नागरिकांचा बळी, 400 कोटी रूपयांच्या मालमत्तेचं नुकसान





*शिमला-* मुसळधार पावसानं हिमाचल प्रदेशात हाहाकार उडाला आहे. मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशात तब्बल 37 पेक्षा जास्त नागरिकांचा बळी गेला आहे. तर 400 कोटी रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान झालं, अशी माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे विशेष सचिव डीसी राणा यांनी दिली आहे. भारतीय हवामान विभागानं 7 जुलैपर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मुसळधार पावसाचा फटका बसलेल्या परिसरात बचावकार्य सुरू आहे. विशेष म्हणजे मंडी जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा विस्कळीत झाली आहे, असंही राणा यांनी यावेळी सांगितलं.


हिमाचल प्रदेशात झालेल्या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 37 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर 400 कोटीच्या मालमत्तेचं नुकसान झालं आहे. याबाबत बोलताना राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि महसूल विभागाचे विशेष सचिव डीसी राणा यांनी बुधवारी माध्यमांना माहिती दिली. ते म्हणाले की, "प्रशासनानं नोंद केल्याप्रमाणं आतापर्यंत 400 कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्तेचं नुकसान झालं आहे. प्रत्यक्ष नुकसान खूप जास्त असण्याची शक्यता आहे. सध्या आमचं प्राथमिक लक्ष्य शोध, बचाव आणि पुनर्वसन करण्यावर आहे. झालेल्या नुकसानीची तपशीलवार आकडेवारी करण्यास वेळ लागेल. मंडीमधील थुनाग उपविभागाला सर्वाधिक पावसाचा फटका बसला आहे. पावसामुळे रस्ते बंद आहेत, वीज आणि पाणीपुरवठा प्रभावित झाला आहे. वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला आहे. वरिष्ठ अधिकारी तिथं तैनात आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते रस्ते दुरुस्तीचं काम करत आहेत. तर विद्युत मंडळाचे अधिकारी, जलशक्तीचे मुख्य अभियंता देखील मंडीमध्ये उपस्थित आहेत," असंही राणा यांनी यावेळी सांगितलं.


मुसळधार पावसानं आतापर्यंत 37 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या काळात रस्ते अपघातांमुळे 26 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. केवळ मंडी जिल्ह्यात 40 नागरिक बेपत्ता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या नागरिकांची शोध मोहीम सुरू आहे, असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं. "मंडीमधील एक गाव उद्ध्वस्त झालं आहे. भारतीय हवाई दलानं गुरुवारी मदत शिबिर उभारलं आहे. या नागरिकांना अन्नाची पॅकेट्स हवेतून टाकण्यात आले आहेत," असंही राणा यांनी यावेळी सांगितलं. "या घटना जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलाचा परिणाम आहेत. हिमाचल प्रदेशही या परिणामांपासून अलिप्त नाही," असं राणा यांनी सांगितलं. हिमाचल प्रदेशात सध्या 250 पेक्षा जास्त रस्ते बंद आहेत. 500 पेक्षा जास्त वीज वितरण ट्रान्सफॉर्मर (डीटीआर) बंद आहेत. तर तब्बल 700 पिण्याच्या पाण्याच्या योजनांवर परिणाम झाला आहे.