विजयपूर जिल्ह्यातील मनगोळी जवळ झालेल्या भीषण अपघातात सहा जण ठार
विजयपूर/प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
विजयपूर जिल्ह्यातील बसवनबागेवाडी तालुक्यातील मनगोळी शहराजवळ राष्ट्रीय महामार्ग ५० वर बुधवारी सकाळी ६-३० वाजता झालेल्या भीषण अपघातात पाच जण घटनास्थळीच ठार झाले. गंभीर जखमी झालेल्या बस चालकाचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात काही जण जखमी झाले आहेत.
हा अपघात महिंद्रा TUV 300 बलोरा कार, कंटेनर आणि खाजगी बसमध्ये झाला. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच मनगोळी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला आहे.
महिंद्रा बलरो कार ही विजयपूरकडे जात असताना डिव्हायडर ओलांडून समोरून येणाऱ्या खाजगी बसला धडकली. त्यानंतर नियंत्रण सुटलेली बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरवर आदळली. या अपघातात बस चालक बसवराज लमानी (वय ४८)गंभीर जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, पण उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मात्र, बसमधील प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती आहे.
महिंद्रा कारमध्ये तेलंगणामधील पी. भास्कर (वय ३६) यांच्या कुटुंबातील सदस्य प्रवास करत होते. त्यांनी मुरुडेश्वर आणि इतर पर्यटनस्थळांची पाहणी करून परतत असताना ही दुर्घटना घडली. पी. भास्कर हे विजयपूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील होरती गावातील कॅनरा बँकेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. अपघातात पी. भास्कर, त्यांच्या पत्नी पवित्रा( ३४), मुलगा अभिराम (वय १४) आणि मुलगी जोश्ना (वय १२) यांचा जागीच मृत्यू झाला. कार चालक विकास मुकणी (वय ३० रा. होरती गावातील) याही अपघातात ठार झाला. मात्र कारमधील १० वर्षांचा एक मुलगा गंभीर जखमी असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ही बस मुंबईहून बल्लारीकडे जात होती. अपघातानंतर बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये हलविण्यात आले. घटनास्थळी पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शंकर मारिहाळ आणि इतर अधिकाऱ्यांनी भेट दिली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, मनगोळी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

