घरगुती गॅस सिलिंडरचा अनधिकृत वापर, 110 सिलेंडर जप्त
विजयपूर / प्रतिनिधी - दिपक शिंत्रे
शहरात घरगुती वापरासाठी असलेल्या एलपीजी सिलेंडरांचा अनधिकृत वापर होत असल्याच्या ठिकाणी धाडी टाकून, 2024 च्या नोव्हेंबर महिन्यापासून आतापर्यंत एकूण 110 सिलेंडर जप्त करून 19 प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभागाचे उपसंचालक विनयकुमार पाटील यांनी दिली आहे.
शहरभर अनधिकृतपणे ऑटो, हॉटेल्स, रस्त्याच्या कडेला खाद्यपदार्थ तयार करणारे विक्रेते आणि इतर व्यावसायिक उपक्रमांमध्ये घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक सिलेंडरमध्ये परत भरून विक्री करणाऱ्यांवर पोलिस विभागाच्या सहकार्याने धाडी टाकून प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.
एलपीजी गॅसचा अनधिकृत वापर करणे तसेच व्यावसायिक सिलेंडरमध्ये परत भरून विक्री करणे हे कायदेशीर गुन्हा आहे. असे प्रकार निदर्शनास आल्यास, संबंधितांविरुद्ध कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे सिलेंडर जप्त करण्यासोबतच अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 च्या कलम 3/7 अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
