रत्नागिरी आरटीओ बनले आयकॉन
पुढारी समूहाच्या वतीने अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान
नागरिकांना शिस्तबद्ध व गतिमान सेवा पुरवण्यात कार्यालय अग्रेसर
हा सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान- राजवर्धन करपे
रत्नागिरी/ प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्हा उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाला नुकतेच पुढारी समूहाकडून पुढारी आयकॉन सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री व राजभाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदयजी सामंत यांच्या हस्ते जिल्ह्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे व सहाय्यक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर यांच्यासह कार्यालयातील सर्व अधिकारी वर्गाने कार्यालयीन गणवेशात उपस्थित राहून हा सन्मान स्वीकारला. यावेळी पुढारी उद्योग समूहाचे जाधव साहेब व अन्य मान्यवर उपस्थित होते.
पुढारी उद्योग समूहाच्या वतीने जिल्ह्यातील काही संस्था व व्यक्तींना पुढारी आयकॉन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये रत्नागिरी जिल्हा उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा देखील उद्योग मंत्री व मराठी राजभाषा मंत्री तथा पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये गेली अनेक वर्षापासून नागरिकांना गतिमान सेवा पुरवण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात आहे. पारदर्शक व शिस्तबद्ध कामकाज हे या कार्यालयाचे वैशिष्ट्य बनले आहे. सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर व नव्याने रुजू झालेले उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी कार्यालयीन कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण केलेल्या शिस्तीमुळे या कार्यालयाच्या कामकाजाबद्दल नागरिकांमधून येणाऱ्या तक्रारींचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी आपल्या विभागाचे कामकाज अत्यंत सचोटीने करत असल्याचे चित्र पाहायला मिळते.यामुळे सेवाहमी कायद्याची अंमलबजावणी अत्यंत प्रभावीपणे होताना दिसते.
सध्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालय संदर्भातील सर्व सेवा ऑनलाइन झाल्या आहेत. सर्व ऑनलाईन कामकाज वेळीच पूर्ण करण्यामध्ये सर्व विभागातील कर्मचारी प्रयत्नशील असल्याचे दिसून येते. सेवा ऑनलाईन झालेल्या असताना देखील कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला उचित मार्गदर्शन करण्याचे काम कर्मचारी स्तरावर केले जाते. गाडी चालवण्याचा परवाना अथवा अन्य सर्व प्रकारचे परवाने पोस्टाद्वारे नागरिकांपर्यंत वेळीच पोहोचवण्यासाठी कर्मचारी विशेष प्रयत्नशील असतात. माहिती अधिकार अथवा या अनुषंगाने येणारी सर्व कामे वेळीच पूर्ण होतील या अनुषंगाने कार्यालयीन प्रमुख म्हणून सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांचे विशेष लक्ष असते. कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला समाधानकारक सेवा देण्याच्या हेतूने कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी कार्यरत असल्याचे सहाय्यक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर यांनी सांगितले.
पुढारी सारख्या वृत्तपत्राने कार्यालयातील कामकाजाची दखल घेऊन उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाला पुढारी आयकॉन हा सन्मान दिला ही बाब खूपच अभिमानास्पद आहे. कार्यालयात कार्यरत असणारे सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या कार्यतत्पर सेवेमुळेच कार्यालय सन्मानास पात्र ठरले आहे. त्यामुळे हा सन्मान सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाचा असल्याचे कार्यालयाचे प्रमुख उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी सोलापूर 24तास न्युज चॅनेल शी बोलताना सांगितले.

