वैद्यकीय विद्यार्थीवर रॅगिंग प्रकरणी पाच जणांना अटक
विजयपुर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
शहराजवळील तोरवी रोडवरील अल अमीन मेडिकल कॉलेजमध्ये मूळचा जम्मू काश्मीरचा रहिवासी असलेल्या हमीन नासीर हुसेनी या काश्मिरी विद्यार्थ्यांवर रॅगिंग करणाऱ्या पाच सिनिअर विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
हमीनच्या कुटुंबातील एका सदस्याने पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी.के शिवकुमार यांना अकाऊंट X वर अल अमीन मेडिकल कॉलेजमधील एमबीबीएस विद्यार्थ्यावर रॅगिंग केल्याबद्दल ट्विट केले होते. या ट्विटनंतर विजयपुर पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
विजयपूरचा विद्यार्थी मोहम्मद कासार (23), बेल्लारी जिल्ह्यातील समीर तडपत्री (24), रायचूर जिल्ह्यातील शेख सावूद (23), बेल्लारी येथील मन्सूर बाशा (24) आणि मुझफ्फर जमादार (23) या सर्व आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंतिम वर्षाचे विद्यार्थी असून विजयपुर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.