भावसार समाजाच्या महिला मंडळाच्या वतीने हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
भावसार समाज महिला मंडळाच्या वतीने रथसप्तमीच्या दिवशी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील भावसार सांस्कृतिक भवनात आयोजित समारंभात सुरुवातीला श्री हिंगलाज मातेची पूजा, आरती करण्यात आली. गायत्रीमंत्र , कु. समृद्धी आकोडे हिचा सुंदर सांस्कृतिक स्वागत नृत्याने कार्यक्रमास सुरुवात झाली. महिला भगिनींनी सुर्य नमस्कार सादरीकरण केले
या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या प्रा. रेखा कुलकर्णी यांनी आजची पिढी, आईचे कर्तव्य व जबाबदारी या विषयावर संबोधित करताना, आई ही प्रत्येक मुलांचा जीवनात महत्त्वाच्या भूमिका पार पाडत असते तिचे व्यवस्थापन हे जगातील एकमेव सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन आहे. ईश्वर, देवी रुपी आई ही फक्त आपल्या मुलांची आई नसते तर ती सर्वांची आई असते आईच एक सुसंस्कृत पिढी निर्माण करु शकते असे सांगितले.
याच कार्यक्रमात विजयपूर जिल्हा मराठी साहित्य परिषदेचे नूतन अध्यक्ष दिपक शिंत्रे व मराठी साहित्य परिषदेच्या कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती झालेल्या सौ. रुपा प्रदीप हिबारे यांचा सत्कार करण्यात आले
याप्रसंगी बोलताना दिपक शिंत्रे म्हणाले, मराठी ही आपली मातृभाषा, तिचे संवर्धन करण्याची नैतिक जबाबदारी ही मराठी भाषा बोलणाऱ्या प्रत्येक समाजाची आहे. मराठी भाषा संवर्धनचा संस्कार कुटुंबातून व्हावे, भले आपल्या पाल्यांना इंग्रजी, कन्नड माध्यमातून शिक्षण देण्यात येते असले तरी मुलांना मराठी साहित्य वाचण्याची सवय लावली पाहिजे मराठी मासिक, दैनिकेचा वाचनामुळे बौद्धिक, मानसिक विकासा बरोबरच सामान्य ज्ञान प्राप्त होते असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमात सौ.राजश्री मिरजकर यांच्या नेतृत्वाखाली हिंगलाज भजन मंडळाच्या वतीने भारुड सादर करण्यात आले अनेक मुलामुलींनी आकर्षक नृत्यकला सादर केले.
महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ पद्माताई इजंतकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेक्रेटरी सौ.लता झिंगाडे यांनी केले तर शेवटी सौ राजश्री हिरासकर यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी महिला मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले
अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली .