कुष्ठरोग निवारण पंधरवडा निमित्त
दुधनी/- शरद कुलकर्णी - विशेष लेख
कुष्ठरोग : एक सामान्य आजार
हा सावकाश पसरणारा जिवाणूजन्य आजार आहे. हॅन्सन या शात्रज्ञाच्या नावावरूनही कुष्ठरोग ओळखला जातो. 1873 साली त्यांनी या रोगाच्या जंतूचा “मायकोबॅक्टेरियम लेप्रि”चा शोध लावला. या जिवाणूच्या संसर्गाने त्वचेमध्ये अस्वाभाविक बदल होतात. त्वचेवर चट्टे उमटतात. त्वचेवरील हे चट्टे वेगवेगळ्या आकाराचे असतात. त्यांची कडा गडद रंगाची आणि मध्यभाग फिकट रंगाचा दिसतो. हे चट्टे पांढरे , लालसर रंगाचे , सपाट किंवा उंचावलेले असतात. त्याच बरोबर याचा परिणाम मज्जातंतूवरही होतो. उपचारास ऊशिर झाल्यास हातातील आणि पायातील परिघवर्ती चेता , नाकाची अंतत्त्वचा, घसा आणि डोळ्यावर परीणाम होतो. संवेदना नाहिशी झाल्याने हाता पायाची बोटे वाकडी होतात. म्हणजे विकृती येते.
मायकोबॅक्टेरियम लेप्रि शरीरातील थंड ठिकाणी वाढतो. त्यामुळे त्वचा, अंतत्त्वचा आणि चेता यामध्ये तो वाढतो. चेतामध्ये वाढल्याने चेता नष्ट होतात आणि त्या भागाची संवेदना नाहिशी होते. हातापायांच्या बोटांची संवेदना नाहिशी झाली की त्यांना इजा होण्याची शक्यता वाढते. व जखमा होतात. बधिरता आल्याने त्रास जाणवत नाही त्यामुळे दुर्लक्ष होते. जखमा वाढतात व पेशी मृत पावतात. अशाने अवयव विद्रूप होतात. यामुळे पुर्वीच्या काळात कुष्ठरोगाचे रुग्ण समाजापासून वेगळे ठेवले जात. त्यांच्यासाठी वेगळ्या वस्त्या असत.
अजूनही समाजात या रोगाबाबत हीन भावना, गैरसमज व अंधश्रद्धा आहेत. हा रोग वेगाने पसरणारा संसर्गजन्य नाही म्हणजे सौम्य संसर्ग जन्य आहे. त्याची वाढ अत्यंत सावकाश होते. घरात उपचार घेतलेला कुष्ठरुग्ण असेल आणि कुष्ठरोग्याची तपासणी/उपचार करणारा वैद्यकीय कर्मचारी यांच्यापासून तो पसरत नाही. तो पूर्णपणे बरा होतो. सध्या कुष्ठरोगावर बहुविध औषधोपचार पध्दती ही रामबाण उपचार पद्धती आहे. याने रोग लवकरात लवकर बरा होतो. पहिल्या मात्रेतच त्याचा संसर्ग पसरविण्याचा धोका कमी होतो.
कुष्ठरोगाचे जिवाणू शरीराच्या त्वचेवर परिणाम करत असल्याने केसांची मुळे, घाम येणा-या ग्रंथी, आणि संवेदी चेता यांचा नाश होतो. परिणामी त्वचा कोरडी आणि रंगहीन बनते. त्वचा संवेदनहीन झाल्याने स्पर्शज्ञान होत नाही. चेहरा, हात आणि पायाच्या मज्जातंतू आकाराने मोठ्या होतात. डॉक्टरांना त्या सहज जाणवतात.
# लक्षणे
त्वचेवरील चट्टे संवेदनाहीन होणे हे कुष्ठरोगाचे पहिले लक्षण आहे. प्रगत अवस्थेत कुष्ठरोगामध्ये नाकाचा आकार मोठा होतो. नाकाच्या अंतत्त्वचेमध्ये कुष्ठरोगाच्या गाठी आल्याने हा परिणाम होतो. चेह-यावर आणि शरीरभर गाठी हे दुसरे लक्षण. कुष्ठ रोग्याना वेदना होत नाहीत असा सर्वसाधारण समज असला तरी परिघवर्ती चेतांच्या टोकांचा दाह होणे ही बहुतेक रोग्यांची नेहमीची तक्रार असते. दाह कमी करण्यासाठी कॉर्टिकोस्टिरॉइड्स द्यावी लागतात. कुष्ठरोगाच्या जिवाणूचा अधिशियन कालावधी सहा महिन्यापासून पाच वर्षे वा अधिक असू शकतो.
# प्रसार
उपचार न घेतलेल्या रुग्णाच्या नाकातील स्त्रावामध्ये मोठ्या संख्येने एम लेप्रि असतात. ते शिंकले, खोकले की यातून लाखो जंतू बाहेर पडतात. ज्याचा घनिष्ट व वारंवार संपर्क आलेला, ज्यांची कुष्ठरोगा विषयी रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे अशांना कुष्ठरोगाची लागण होऊ शकते. भारतात कुष्ठरोगाविषयी ९५ टक्के लोकांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे.
# निदान
संशयित लक्षणांवरून कुष्ठरोगाचे निदान केले जाते. कुष्ठरोगाची निदानात्मक लक्षणे, संवेदना चाचणी, मज्जातंतू चाचपणी, केल्याने रोग निदान सहज शक्य आहे. काही वेळा आवश्यक असल्यास त्वचा विलेपन तपासणी करून कुष्ठरोगाचे निदान केले जाते. अशा रुगणांचे प्रमाण अत्यल्प आहे. कुष्ठरोगाचे निदानात्मक लक्षणांवरून दोन प्रकारात वर्गीकरण करुन उपचार सुरू करण्यात येतो. १ ते५ चट्टे, किंवा एकच मज्जा बाधित असणारे - असांसर्गिक प्रकार. ५ पेक्षा अधिक चट्टे, एक पेक्षा अधिक मज्जा बाधित, त्वचा विलेपन तपासणीत कुष्ठ जंतू आढळलेले रुग्ण- सांसर्गिक प्रकार. कुष्ठरोगाचे निदान सर्व शासकीय निमशासकीय दवाखान्यात मोफत व दररोज केले जाते.
# उपचार
सर्वात सुरुवातीला कुष्ठरोगावरील उपचारामध्ये डॅप्सोन हे औषध दिले जात असे. जेंव्हा हे औषध नव्याने वापरात आले त्या वेळी त्याची परिणामकता उत्तम होती. पण काहीं वर्षांनंतर डॅप्सोन प्रतिकार जिवाणू आढळल्यानंतर बहु उपचार पद्धती वापरण्यात येऊ लागली. या उपचार पद्धतीला एमडीटी (मल्टि ड्र्ग थेरपी) म्हणतात. एमडीटी मध्ये डॅप्सोन, रिफांपिसीन आणि क्लोफॅझिमिन (लॅम्प्रीन) या तीन जिवाणूप्रतिबंधक औषधांचा उपयोग करण्यात येतो. सांसर्गिक प्रकारच्या कुष्ठरोगावर तीनही औषधे देण्यात येतात. असांसर्गिक प्रकारच्या कुष्ठरोगावर मात्र फक्त रिफांपिसीन आणि डॅप्सोनचा वापर करण्यात येतो. उपचार चालू करण्याआधी बरेच रुग्ण संसर्गजन्य असतातच असे नाही. कुष्ठरोगाच्या प्रकारानुसार असांसर्गिक प्रकारच्या रुग्णांसाठी सहा महिन्याचा, सांसर्गिक प्रकारच्या रुग्णांसाठी बारा महिने उपचार घ्यावे लागतात. कुष्ठरोगाच्या औषधांचा थोडा नगण्य परिणाम होतो. हा उपचार सर्व शासकीय, निमशासकीय दवाखान्यात मोफत व दररोज दिला जातो.
# गुंतागुंत
कुष्ठरोगाच्या रुग्णांना उपचारा पुर्वी , उपचार चालू असताना व उपचार पुर्ण झाल्यावर रिॲेक्शन येवू शकते. काही वेळा शरिरावर गाठी येतात. या प्रकारास इरिथेमा नोडोसम लेप्रोसम म्हणतात. यावर औषधोपचार उपलब्ध आहे. त्याचा वापर करून रिॲेक्शन आटोक्यात आणली जाते.
# पुनर्वसन
कुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो. मज्जातंतू आणि अवयवामध्ये झालेले बदल काही वेळी दुरुस्त करता येत नाहीत. कुष्ठरोग्याचे पुनर्वसन हा कुष्टरोगाच्या उपचारचा अविभाज्य भाग आहे. पुनरर्चना शस्त्रक्रिया, बिघडलेले अवयव दुरुस्त करणे करिता पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया करावी लागते. कधी कधी अवयव पुन्हा कार्य करण्यापलिकडे गेलेले असल्याने शस्त्रक्रियेचा उपयोग होत नाही. सर्वंकष उपचारामध्ये रुग्णास स्वावलंबी बनविण्यावर भर दिलेला असतो. मज्जातंतूमध्ये मोठ्या प्रमाणात बिघाड झाला असल्यास अवयवामध्ये विकृती येण्याची शक्यता असते. संवेदना रहित( बधिर) अवयवाची काळजी घेणे याचे प्रशिक्षण रुग्णाना द्यावे लागते. (मधुमेही रुग्णामध्ये पायाची काळजी घेण्यास शिकवले जाते) हातापायांच्या जखमा असल्यास त्यावर त्वरित उपाययोजना करावी लागते. पायाच्या जखमेकडे दुर्लक्ष केल्यास जखमा जिवाणुसंसर्गाने चिघळतात. भौतिकोपचाराने हाता पायाची बोटे कार्यक्षम ठेवण्यास मदत होते. पुर्वी भारतात अशा रुग्णानां हातमागाचे प्रशिक्षण दिले जात होते. यामुळे हात आणि पाय कार्यक्षम राहण्यास मदत होते. कुष्ठरोग्यासाठी खास पद्धतीची पादत्राणे बनवली जातात. त्यामुळे पायास जखम होणे टळते.
# प्रतिबंध
कुष्ठरोगावर लस उपलब्ध नाही. त्वरित निदान आणि उपचार केल्याने इतिहास काळातील या रोगावर मात केली आहे. प्राथमिक अवस्थेत कुष्ठरोगाचे निदान करुन तात्काळ बहुविध औषधोपचार देऊन संसर्गाची साखळी खंडीत करणे हा प्राधान्याने करायचा उपाय, व कुष्ठरोग्याशी संपर्क आलेल्या व्यक्तीची तपासणी करून नवीन रूग्णांचा शोध घेऊन उपचार करणे
हाही नवे रुग्ण होण्याचे थांबवण्याचा उत्तम मार्ग आहे. नविन शोधलेल्या रुग्णाच्या सहवासातील व्यक्तीनां प्रतिबंधक उपाय म्हणून रिफांपिसीनची एक मात्रा उपचार दिली जाते व संसर्ग टाळण्यात येतो.
शरद कुलकर्णी, अवैध्यकिय सहाय्यक,
नागरी कुष्ठरोग केंद्र, दुधनी - मैंदर्गी,
ता.अक्कलकोट, जि.सोलापूर