Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

सांघिक जेतेपदासह महिला गटाचे विजेतेपद पटकावले

Responsive Ad Here

 राष्ट्रीय योगासन स्पर्धेत महाराष्ट्राचा दबदबा



सांघिक जेतेपदासह महिला गटाचे विजेतेपद पटकावले




 

मुंबई / क्रिडा प्रतिनिधी - बाळ तोरसकर 

मुंबई : बंगळुरु येथे झालेल्या पाचव्या वरिष्ठ राष्ट्रीय योगासन क्रीडा अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राने प्रभावी कामगिरी करत एकूण ८ पदके मिळवली. या यशात ५ सुवर्ण, १ रौप्य आणि २ कांस्य पदकांचा समावेश आहे. महाराष्ट्राने या स्पर्धेत सांघिक जेतेपदासह महिला गटाचेही विजेतेपद पटकावून आपला दबदबा सिद्ध केला.


 


योगासन भारत आणि कर्नाटक योगासन क्रीडा संघटनेच्या संयुक्त विद्यमाने तुमकूर (बंगळुरु) येथील महात्मा गांधी स्टेडियममध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्र योगासन क्रीडा संघटनेचे (एमवायएसए) अध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, तांत्रिक संचालक सतीश मोहगावकर, सचिव राजेश पवार, राज्य व्यवस्थापक ऋषिकेश बागडे, हर्षल छुते यांच्यासह पुरुष संघाचे प्रशिक्षक संदेश खरे आणि महिला संघाच्या प्रशिक्षिका हेमवंता सोनावणे-नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र संघाने ही उज्ज्वल कामगिरी केली.


 


महिला गटातील वर्चस्व


महिला गटात महाराष्ट्राने आपले वर्चस्व सिद्ध करत एकहाती विजय मिळवला. वरिष्ठ अ पारंपरिक योगासन गटात सोनाली खरमाते हिने मध्य प्रदेशच्या आरती पालसोबत संयुक्तपणे सुवर्णपदक पटकावले. दोघींनी प्रत्येकी ५८.८८ गुणांची कामगिरी केली. तन्वी रेडिजने वरिष्ठ गटात कलात्मक योगासन एकेरी प्रकारात १२७.५ गुणांसह सुवर्णपदक पटकावले. तिने तामिळनाडूच्या वैष्णवी सर्वणाकुमारचे (१२४.३) आव्हान परतावले.


 


पूर्वा किनारे आणि प्राप्ती किनारे यांनी वरिष्ठ कलात्मक दुहेरी गटात सुवर्ण जिंकले, तर सुहानी गिरिपुंजे आणि रचना अंबूळकर यांनी वरिष्ठ तालबद्ध दुहेरी गटात शानदार सादरीकरण करत सुवर्णपदक पटकावले. यानंतर सुहानी, रचना, तन्वी रेडिज, छकुली सेलोकर आणि पूर्वा यांनी वरिष्ठ कलात्मक सांघिक गटात महाराष्ट्रासाठी सुवर्ण जिंकले. या गटात महाराष्ट्राने ११३.९५ गुणांसह अव्वल स्थान मिळवले, तर हरियाणाने १११.९५ गुणांसह रौप्यपदक जिंकले.


 


पुरुष गटातील कामगिरी


पुरुष गटातही महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. वैभव देशमुख आणि प्रणय कांगले यांनी वरिष्ठ तालबद्ध दुहेरी गटात रौप्यपदक पटकावले. रूपेश सांघेने वरिष्ठ कलात्मक एकेरी गटात कांस्यपदक जिंकले.


 


वरिष्ठ क गटाच्या पारंपरिक एकेरी गटात राखी गुगळेने कांस्यपदक जिंकून महाराष्ट्राच्या पदकांच्या यादीत भर घातली.


 


महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन करत संघाला सांघिक विजेतेपदासह महिला गटाचे विजेतेपद मिळवून दिले, हे राज्यासाठी अभिमानास्पद आहे.