बेळगाव अधिवेशन महिनाभर चालवावे
जनतेच्या समस्या ठरावीक मुदतीत सोडवाव्यात : संदीप पाटील यांची मागणी
विजयपूर/प्रतिनिधि -दिपक शिंत्रेे
बेळगाव येथे होणारे हिवाळी अधिवेशन केवळ औपचारिकता न राहता उत्तर कर्नाटकातील जनतेच्या प्रश्नांवर सखोल चर्चा करणारे ठरावे. जनतेच्या समस्या सभागृहात मांडून त्या ठरावीक कालमर्यादेत सोडविण्यासाठी सरकारने ठोस निर्णय घ्यावेत. त्यासाठी बेळगावचे अधिवेशन किमान महिनाभर चालवावे, अशी मागणी भाजपाचे शहर मंडळ अध्यक्ष संदीप पाटील यांनी केली.
बेळगाव येथील सुवर्ण विधानसौधमध्ये होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही मागणी केली. उत्तर कर्नाटकातील शेतकरी, कामगार, सर्वसामान्य नागरिक तसेच विविध विकासकामांशी संबंधित अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रश्नांवर केवळ चर्चा न करता त्यावर निर्णय घेऊन अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बेळगाव अधिवेशनाचा मुख्य उद्देश उत्तर कर्नाटकातील समस्या शासनाच्या निदर्शनास आणून त्यावर उपाययोजना करणे हा आहे. मात्र, अधिवेशनाचा कालावधी कमी असल्यामुळे अनेक महत्त्वाचे प्रश्न सविस्तरपणे चर्चेला येत नाहीत. त्यामुळे अधिवेशनाचा कालावधी वाढवून महिनाभर करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
प्रश्न सोडविण्यासाठी निश्चित कालमर्यादा हवी
जनतेच्या समस्या सभागृहात मांडल्यानंतर त्या केव्हा सोडविल्या जाणार, याबाबत स्पष्ट कालमर्यादा निश्चित करावी. संबंधित विभागांनी प्रत्येक प्रश्नाची जबाबदारी स्वीकारून त्यावर कार्यवाही अहवाल सादर करावा. अधिवेशनातील चर्चा केवळ कागदोपत्री न राहता त्याचे परिणाम जनतेला प्रत्यक्ष दिसले पाहिजेत, असेही पाटील यांनी सांगितले.
उत्तर कर्नाटकातील सिंचन, शेती, रस्ते, पायाभूत सुविधा, रोजगार, औद्योगिक विकास आणि नागरी सुविधांसह विविध प्रश्नांना अधिवेशनात प्राधान्य मिळावे. लोकप्रतिनिधींना आपल्या मतदारसंघातील समस्या प्रभावीपणे मांडण्यासाठी पुरेसा वेळ मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, यंदाचे बेळगाव हिवाळी अधिवेशन डिसेंबरमध्ये होणार असून त्यासाठी प्रशासनाकडून तयारी सुरू आहे. उपलब्ध माहितीनुसार अधिवेशनाचा कालावधी सध्या मर्यादित ठेवण्याची तयारी आहे. त्यामुळे अधिवेशनाचा कालावधी वाढवून उत्तर कर्नाटकाच्या प्रश्नांवर व्यापक चर्चा करण्याची मागणी पुन्हा जोर धरत आहे.
