*आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकलेल्या सचिन साळुंके यांचा सन्मान
*कॉमनवेल्थ पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत रौप्यपदक; केकेएमपी तर्फे ₹२० हजारांचे प्रोत्साहन*
विजयपुर प्रतिनिधि - दिपक शिंत्रे
कॅनडा येथे झालेल्या कॉमनवेल्थ पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक पटकावून भारताचा नावलौकिक आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावणारे विजयपूर जिल्ह्यातील तिगणी बिदरी गावचे सुपुत्र सचिन तुकाराम साळुंके यांचा कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषद (KKMP), विजयपूर जिल्हा शाखेतर्फे सन्मान करण्यात आला.
सचिन साळुंके यांच्या उल्लेखनीय क्रीडा कामगिरीचे कौतुक करून त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट देऊन गौरविण्यात आले. तसेच, खेळाडूला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने परिषदेच्या वतीने २० हजार रुपयांची प्रोत्साहनपर आर्थिक मदत देण्यात आली. केके एमपी चे विजयपूर जिल्हाध्यक्ष बी. बी. शिवाळकर यांच्या नेतृत्वाखाली हा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी समाजातील विविध मान्यवर उपस्थित होते.
सचिन साळुंके यांनी आपल्या मेहनतीच्या, शिस्तीच्या आणि आत्मविश्वासाच्या बळावर आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात मिळविलेले यश विजयपूर जिल्ह्यासह तिगणी बिदरी गाव आणि संपूर्ण मराठा समाजासाठी अभिमानास्पद आहे. त्यांच्या या यशामुळे जिल्ह्यातील युवा खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्यासाठी नवी प्रेरणा मिळणार आहे.
यापुढील काळातही सचिन साळुंके यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदकांसह अनेक यश संपादन करावे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवावा, अशा शुभेच्छा यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
**कर्तृत्ववान खेळाडूंचा सन्मान आणि त्यांच्या यशाला प्रोत्साहन देणे ही समाजाची जबाबदारी आहे,** असा संदेश या गौरव सोहळ्यातून देण्यात आला.
