पत्नीच्या हत्येप्रकरणी आरोपीला जन्मठेप, ₹1 लाखांचा दंड
विजयपूरात/ प्रतिनिधि - दिपक शिंत्रेे
पत्नीची हत्या करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा आणि ₹1 लाखांचा दंड ठोठावत विजयपूर येथील प्रधान जिल्हा व सत्र न्यायालयाने निकाल दिला आहे.
प्रकरणातील माहितीनुसार, विजयपूर शहरातील जलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवशक्ती नगर येथे भाड्याच्या घरात राहणारा रफीक अस्तगीरसाब बलगानूर हा आपल्या पत्नी परवीन हिच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा सतत छळ करत होता. याप्रकरणी समाजातील ज्येष्ठांनी पंचायत घेऊन समज दिली होती. मात्र, त्याने पत्नीचा छळ थांबवला नव्हता.
17 ऑक्टोबर 2016 रोजी रात्री 8 वाजल्यापासून 20 ऑक्टोबर 2016 रोजी दुपारी 3 वाजेदरम्यान रफीकने धारदार शस्त्राने पत्नी परवीन हिच्या मानेवर, छातीवर, पाठीवर आणि खांद्यावर वार करून तिची हत्या केली. त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने घराला कुलूप लावून तो फरार झाला.
या प्रकरणी जलनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 302 (खून) आणि 201 (पुरावे नष्ट करणे) अन्वये गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.
या प्रकरणाची सुनावणी विजयपूरचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश हरीश ए. यांनी केली. सरकारी पक्षाने सादर केलेले साक्षीपुरावे ग्राह्य धरून आरोपी रफीक अस्तगीरसाब बलगानूर याच्यावरील आरोप सिद्ध झाल्याचा निष्कर्ष काढला. त्यानुसार न्यायालयाने 30 जून 2026 रोजी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा आणि ₹1,00,000 दंड अशी शिक्षा सुनावली.
या गुन्ह्याची नोंद तत्कालीन पीएसआय एन. एस. जनगौडा यांनी केली होती. तपास सीपीआय बसवराज यलगार आणि सीपीआय सुनील कांबळे यांनी केला. न्यायालयात साक्षीदार हजर करण्याचे काम हेड कॉन्स्टेबल जे. पी. पवार यांनी पार पाडले. सरकारतर्फे प्रधान सरकारी अभियोक्ता *एस. एच. हकीम यांनी बाजू मांडली.
