वाहतूक नियंत्रण करत असताना पोलिसांवर हल्ला
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
जिल्ह्यातील मुद्देबिहाळ शहरातील बसवेश्वर सर्कल आणि बसस्थानक परिसरात संध्याकाळी वाहतूक नियंत्रण करत असताना पोलिसांवर हल्ला झाल्याची घटना घडली असून कारमधून आलेल्या काही जणांनी पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून वाद घातला आणि नंतर हल्ला केल्याची माहिती आहे.
संध्याकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास बसवेश्वर सर्कलमध्ये वाहनांची गर्दी वाढल्यामुळे वाहतूक सुरळीत करण्यासाठी कर्तव्यावर असलेले पोलिस वाहनांना पुढे जाण्याचे निर्देश देत होते. यावेळी कारमधून आलेल्या आरोपींनी वाहन हटवण्यास नकार देत वरिष्ठ अधिकाऱ्यांचा संपर्क क्रमांक मागून वाद सुरू केला.
पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केला असता आरोपी संतापून कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांचा गणवेश पकडून ओढत, गळा पकडून मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. यावेळी इतर पोलिस कर्मचारी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर आरोपींनी बसस्थानकाजवळ पुन्हा वाहन उभे करून सार्वजनिक वाहतुकीत अडथळा निर्माण केला. माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या सीपीआय अधिकाऱ्यांवरही गैरवर्तन करत गणवेशाचे बटण तोडून ढकलाढकली केल्याची घटना घडली आहे
या घटनेदरम्यान महिला पोलिस कर्मचाऱ्यावरही हल्ला झाला. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेऊन चौकशी केली.
चौकशीत आरोपींची नावे शिवप्पा लमाणी, सायमन लमाणी आणि सुमित्रा लमाणी अशी असल्याचे समोर आले. या प्रकरणात सरकारी कामात अडथळा आणणे, मारहाण, शिवीगाळ आणि खूनाचा प्रयत्न या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास सुरू आहे.
जखमी पोलिस कर्मचाऱ्यांना स्थानिक शासकीय रुग्णालयात दाखल करून उपचार देण्यात आले असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
