कार पलटी झाल्यामुळे दोघांचा मृत्यू, दोघे जखमी
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
कागवाडहून श्रीशैलकडे जात असलेली कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी होऊन झालेल्या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना विजयपूर जिल्ह्यातील बसवन बागेवाडी तालुक्यातील बसवनहट्टी क्रॉस जवळ राज्य महामार्गावर घडली आहे.
चंद्रव्वा टक्केनावर (वय 70)आणि कामप्पा अवरादी (वय 65)अशी मृत्यूची नावे असून कारमधील आणखी दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनास्थळी बसवन बागेवाडीचे पीएसआय गुरुशांत दाश्याळ यांनी भेट देऊन पाहणी केली. ही घटना बसवन बागेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून प्रकरण नोंदविण्यात आले आहे.
