कुत्र्याचा हल्लात विद्यार्थीनी गंभीर जखमी
विजयपुर प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
विजयपूर जिल्ह्यातील कोल्हार येथे शाळेत जाणाऱ्या 11 वर्षीय विद्यार्थिनीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून ओढत नेत चावा घेतल्याची हृदयद्रावक घटना कोल्हार तालुक्यातील सिद्दनाथ गावात घडली असून सिद्रामप्पा निडगुंदी यांची मुलगी तनुश्री (वय 11) ही सिद्दनाथ गावात शाळेत जात असताना भटक्या कुत्र्यांनी अचानक तिच्याभोवती घेराव घालून तिला ओढत नेत हात व पायाला चावा घेऊन गंभीर जखमी केले. जखमी विद्यार्थिनीला तत्काळ तेलगी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
येथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी बसवण बागेवाडी तालुका सरकारी रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिल्याची माहिती मुलीच्या नातेवाईकांनी दिली.गावात इतक्या घटना घडूनही भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तनुश्रीच्या कुटुंबीयांच्या घरी तसेच मेंढ्यांचा मृत्यू झालेल्या ठिकाणी स्थानिक ग्रामपंचायत विकास अधिकारी किंवा तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी यांनी अद्याप भेट दिलेली नाही. त्वरित भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवावे व हल्ल्यामुळे बाधित कुटुंबांना उपचार व नुकसानभरपाई द्यावी, अन्यथा ग्रामपंचायतीसमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
कोल्हार तालुक्यातील सिद्दनाथ गावाच्या बाहेरील शेतात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात यंकप्पा मळेप्पा यांच्या मालकीच्या 4 कोकरांचा मृत्यू झाला असून 3 कोकरं गंभीर जखमी झाली आहेत. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.तालुका पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे सिद्दनाथ ग्रामपंचायत विकास अधिकारी आनंद कोट्याळ यांनी सांगितले.
