स्वामीजींचा अपमान, त्यांचावर गुंडागर्दी केल्याची घटना निषेधार्थ - अरुण शाहापूर
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
, सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी १०० हून अधिक दिवसांपासून आंदोलन सुरू असून समाजहितासाठी अनेकांनी आपली घरे-मठ सोडून आंदोलन करीत आहेत. मात्र गुरुवारी झालेल्या आंदोलनात सहभागी असलेल्या स्वामीजींचे केशरी वस्त्र ओढले गेले, त्यांच्यावर हात उगारण्यात आला आणि त्यांचा मोबाईल हिसकावून घेण्यात आला. ही गुंडागर्दी निषेधार्ह आहे. असे विधानपरिषदेचे माजी सदस्य अरुण शाहापूर यांनी सांगितले
सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेसह विविध मुद्द्यांवर राज्य सरकार विजयपूर जिल्ह्याशी अन्याय व सावत्रपणाची भूमिका घेत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
या आंदोलनात सर्व पक्षांचे, जाती-धर्मांचे आणि विविध विचारसरणींचे लोक सहभागी आहेत. सद्भावनेने सुरू असलेल्या आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांचा स्वीकार केला असता ते मोठेपणाचे ठरले असते. मात्र आंदोलनकर्त्यांना ढकलणे, पोलीस वर्दी न घालता येऊन स्वामीजींचा अपमान करणे योग्य नाही. दडपशाहीलाही मर्यादा असते. सत्ता कायमस्वरूपी नसते. त्यामुळे आंदोलनकर्त्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.
**जनतेला एक चिंता : मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांना दुसरीच चिंता**
ते पुढे म्हणाले की, जनतेला एक चिंता असते, तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांना दुसरीच चिंता असल्यासारखे दिसते. राज्यात राजकीय अस्थिरता व अराजकता निर्माण झाली आहे का, अशी शंका जनतेत आहे. बेंगळुरूच्या कोगिलू वसाहतीतील बेकायदा बांधकाम असलेले शेड हटविल्यानंतर केरळ व पाकिस्तानमधून प्रतिक्रिया येत आहेत. ही वसाहत बेकायदा रहिवाशांचे ठिकाण बनली असून हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे. याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे.
मैसूर आणि बेंगळुरूमध्ये महाराष्ट्र पोलिसांनी अंमली पदार्थ व ड्रग्स जप्त केले आहेत. मग सक्षम असलेल्या राज्य पोलिसांना कोण अडवत आहे? गुप्तचर विभाग काय करत आहे आणि तो कोणाच्या ताब्यात आहे? याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला नेते ईरण्णा रावूर, विजय जोशी उपस्थित होते.
