Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

विजयपूर पोलीसांची कारवाई सुरूच : कोटी रुपयांच्या मालमत्तेची जप्ती

Responsive Ad Here



विजयपूर पोलीसांची  कारवाई सुरूच : कोटी रुपयांच्या मालमत्तेची जप्ती

*सोने, मोटरसायकली चोरी प्रकरणी १४ जनांना अटक*







विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

अवघ्या दोन दिवसांपूर्वी सायबर गुन्ह्यांचा उलगडा करून कोट्यवधी रुपयांची रोख रक्कम जप्त करत ती पीडितांना परत देणाऱ्या विजयपूर पोलिसांनी आता पुन्हा विविध सोन्याच्या चोरी व मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत लाखो रुपयांचे सोने, मोटारसायकली व इतर साहित्य जप्त केले आहे.

   विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दाखल असलेल्या ४८ सोन्याच्या व मोटारसायकल चोरीच्या प्रकरणांशी संबंधित एकूण १४ आंतरराज्य व आंतरजिल्हा आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून अंदाजे ६५ लाख रुपये किमतीचे ४२६.२ ग्रॅम सोन्याचे दागिने, २० लाख रुपये रोख रक्कम, गुन्ह्यासाठी वापरलेल्या ०२ कार तसेच ३९ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. एकूण १,१७,००,००० रुपये किमतीची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

   या संदर्भात माहिती देताना जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निम्बरगी यांनी सांगितले की, या सर्व गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलीस कर्मचाऱ्यांचे प्रयत्न अतुलनीय आहेत. गेल्या काही दिवसांत सुमारे २ कोटी रुपये किमतीची रोख रक्कम व सोने विविध प्रकरणांमध्ये जप्त करून ती संबंधितांना परत देण्यात विभागाला यश आले आहे.


*### बसमधील सोन्याची चोरी प्रकरण : पाच आरोपी अटकेत*

दि. ३० मे २०२५ रोजी विजयपूर–ताळिकोटे बसने प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या जवळील ६५ ग्रॅम सोन्याचे दागिने मनगुळी जवळ चोरीला गेल्याच्या प्रकरणाचा उलगडा करत पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे – प्रकाश वेंकटेश भोयर, अंकुश साहेबराव जाधव, गोवर्धन विठ्ठल पवार, रजनी शिवू भोवी, मंजी प्रशांत भोयर अशी आहेत.

  मनगुळी, तिकोटा, देवरहिप्परगी, बबलश्वेर, आदर्शनगर, गोलगुंबज व निडगुंदी पोलीस ठाण्यांशी संबंधित एकूण ०८ प्रकरणांमध्ये वापरलेली ०१ कार आणि ४२६.२ ग्रॅम सोन्याचे दागिने, असा सुमारे ६५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपींचा शोध घेण्यासाठी रचनाकरण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने मनगुळी गावाजवळील राष्ट्रीय महामार्ग–५० वरील मुळवाड क्रॉसजवळ संशयास्पदरीत्या कारमधून जाणाऱ्या आरोपींना ओळखले. कार थांबवण्याचा इशारा देऊनही त्यांनी न थांबल्याने पोलिसांनी पाठलाग करून आरोपींना अटक केली. चौकशीत सत्य समोर आले, असे एसपी लक्ष्मण निम्बरगी यांनी सांगितले.





*### सोन्याच्या नाण्याच्या नावाखाली फसवणूक : चार आरोपी अटकेत*


खरे सोन्याचे नाणे असल्याचे भासवून लाखो रुपये उकळणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मनगुळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या वर्षी ८ मे रोजी हे प्रकरण दाखल झाले होते. आरोपींनी बनावट सोन्याची नाणी खरी असल्याचे भासवून तक्रारदाराकडून २६ लाख रुपये घेत फसवणूक केली होती.

  या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे – विजयनगर येथील हणमंत उर्फ संतोष लाल मानप्प उर्फ लक्ष्मण कोरचर, राजा गोविंद उर्फ वेंकटेश कावडी, हरीश चौडप्पा कोरचर, चिरंजीवी दुर्गप्पा कोरचर अशी आहेत. आरोपींकडून २० लाख रुपये रोख रक्कम व गुन्ह्यासाठी वापरलेली ०१ कार जप्त करण्यात आली आहे.


*### मोटारसायकल चोरी : तीन आरोपी अटकेत*

   नागठाण व आसपासच्या गावांमध्ये मोटारसायकल चोरी करणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींची नावे – सिद्राम अरकेरी, मंजुनाथ उक्कली, आकाश मठपती अशी आहेत.

  विविध पोलीस ठाण्यांत दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या प्रकरणांशी संबंधित आरोपींकडून एकूण २० मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून त्यांची किंमत सुमारे ७ लाख रुपये आहे.

    विशेष तपास पथक अलीयाबादजवळ कर्तव्य बजावत असताना हे तिघे संशयास्पदरीत्या फिरताना दिसून आले. चौकशी केली असता चोरीचे प्रकार उघडकीस आले.

या पत्रकार परिषदेला एएसपी रामणगौड हत्ती, डीवायएसपी टी.एस. सुल्फी आदी अधिकारी उपस्थित होते.