,* चडचण शहरातील घटना*
दीड वर्षांच्या मुलाच्या अपहरण प्रकरणाला शेवट सुखद
विजयपूर / प्रतिनिधी-दिपक शिंत्रे
जिल्ह्यातील चडचण शहरात दीड वर्षांच्या मुलाच्या अपहरणाच्या प्रकरणाला सुखद शेवट झाला .
चडचणच्या शिवाजी नगर परिसरात मोहम्मद चांदशेख नावाचा दिड वर्षांचा मुलगा आज सकाळी सातच्या सुमारास घराच्या समोर खेळत असताना एका अज्ञात महिलेनं त्याला उचलून नेलं.घटनेनंतर घाबरलेल्या मुलाच्या पालकांनी तात्काळ चडचण पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पालकांकडून माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित पथकं तयार करून शोधमोहीम सुरू केली. तीव्र शोधात, चडचण येथील संगमेश्वर मंदिराजवळ त्या महिलेनं मुलाला सोडून गेल्याची माहिती मिळाली.घटनेच्या ठिकाणी पोहोचलेल्या पोलिसांनी मुलाला सुरक्षितरित्या ताब्यात घेतलं. मुलगा पूर्णपणे ठणठणीत असून त्याला पालकांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे. हे कृत्य केलेल्या महिलेचा शोध घेण्यासाठी पोलिसांची चौकशी सुरू आहे.चडचण पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेचा सुखद शेवट झाल्याने स्थानिकांमध्ये समाधान पसरलं आहे.
