वावी ते मढी पदयात्रेचे शुक्रवारी प्रस्थान
राम सुरसे /वावी प्रतिनिधी (दि.13)
श्रीक्षेत्र मढी (ता. पाथर्डी, जि.अहिल्या नगर) येथील रंगपचमी दिनीचे श्री कानिफनाथ महाराज यात्रोत्सवासाठी सिन्नर तालुक्यातील वावी येथील पाई दिंडीचे आयोजन केले आहे. धुलिवंदनाच्या दिवशी शुक्रवार (दि.14 ) रोजी परिसरातील नाथभक्त पायी दिंडीद्वारे मढीकडे प्रस्थान करणार आहेत.
पदयात्रेत सहभागी होणाऱ्या नाथभक्तांची ठिकठिकाणी अल्पोपाहार व भोजनाची व्यवस्था
केलेली असते. कहांडळवाडी, चिंचोली, तळेगाव, लोणी, कोल्हार, गुहा, टाकळीमिया, केंदळ, सोनई, शनिशिंगणापूर, घोडेगाव, मिरी, तिसगावमार्गे नाथभक्त पायी जातात. बुधवार (दि.12 ) रोजी पदयात्रेत सहभागी होणाऱ्या रथाचे रमेशगिरी महाराज (मठाधिपती, कोपरगाव आश्रम), वावी ग्रामपंचायत उपसरपंच सौ.प्रेमलता व कैलास जाजू यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आली. त्यानंतर शुक्रवार सकाळी अकराला शेकडो नाथभक्तांसह रथाचे व काठीमहाल श्रीक्षेत्र मढीच्या दिशेने प्रस्थान करतील.
वावीचे काठीमहालास मढीत विशेष मान
श्री क्षेत्र मढी येथे मंदिराच्या कळसाची भेट घडवण्यासाठी राज्यातून हजारो काठीमहाल
काठ्या येत असतात. त्यात वावीच्या काठीला विशेष मान आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून वावीची पायी दिंडी सुशोभित रथासह
व काठीमहालासह श्री क्षेत्र मढी येथे जात असतात. दरवर्षी 2000 हून अधिक भाविक या पायी दिंडीत सहभागी होतात.पदयाञेत अबाल वृद्धांसह महिलांची उपस्थिती लक्षणीय असते.
भव्य मिरवणूक व शोभेची दारुची आतषबाजी :-
वावी पदयाञा मंडळाचे वतीने सोमवार दि. 17 रोजी सायंकाळी सात वाजता कानिफनाथ महाराज यांचे रथाची ढोलीबाजा व ताशाच्या गजरात तिसगाव येथे भव्य मिरवणुकीचे आयोजन केलेले आहे. प्रसंगी शोभेच्या दारूची आतषबाजी करण्यात येणार असून सदर आतषबाजी बघण्यासाठी तिसगाव व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थिती
लावतात. तिसगाव येथील व्यापारी वर्ग यांस कडून रथाची विधिवत पूजा केली जाते व उपस्थित भाविकांसाठी जेवणाची व्यवस्था केली जाते. प्रसंगी पाथर्डी पोलीस स्टेशन यास कडून चोक बंदोबस्त ठेवला जातो.
भटक्यांची पंढरी म्हणुन श्री क्षेञ मढी येथील याञा देशात प्रसिद्ध :-
नाथसांप्रदयाचे आद्यस्थान व भटक्यांची पंढरी म्हणुन श्री क्षेञ मढी येथील याञा देशात प्रसिद्ध आहे. या याञेत अठरापगड जातीधर्माच्या समाजाला मान दिला जातो. मढीची प्रसिद्ध रेवडी,गाढवांचा बाजार, मानाची काठी ही याञेची वैशिष्ट्ये आहेत. होळी ते गुढीपाडवा पर्यंत ही भव्य याञा असते. रंगपंचमी हा याञेचा मुख्य दिवस असतो.तरी नाथभक्तांनी या भव्य उत्सवाचा अवश्य लाभ घ्यावा.
सालाबाद प्रमाणे सोमवार दि. 4 रोजी देवस्थानचे विश्वस्त,मढी ग्रामस्थ व नाथभक्तांच्या उपस्थितीत नाथांच्या पादुकांचा जलाभिषेक करण्यात आला. नंतर शंख व नगारा वाद्याच्या गजरात श्री कानिफनाथ महाराज कि जय म्हणत पारंपारिक पद्धतीत नाथांना तेल लावण्यात आले. याञेपूर्वीचा हा महत्वाचा विधी मानला जातो.या पवित्र दिवशी श्री कानिफनाथ महाराज गादीवर ध्यानस्थ बसतात त्यामुळे तेल लागल्या पासुन गुढीपाडव्या पर्यंत नाथांच्या संजिवनी समाधी उत्सवाचा पर्वकाळ असल्याने मढी व निवडुंगे या गावामध्ये गावकरी विविध व्रतबंधने पाळतात. यात नविन कार्यास आरंभ करणे, शेतीची नांगरट इत्यादी कामे, लग्नाची बोलणी करणे, तसेच शुभविवाह,वास्तुशांती ई. मंगलकार्य करणे, गादी व पलंगावर शयन करणे, दाढी-हजामत करणे, तसेच घरामधे पदार्थ तळणे, दाराची चौकट बसवणे ही कामे वर्ज्य केली जातात. हा नाथांच्या भव्य- दिव्य यात्रा उत्सवाचा काळ असल्याने या काळात पावित्र्य सांभाळून श्री कानिफनाथ महाराजांची भक्ती सेवा करता यावी तसेच यात्राकाळात मंदिराची डागडुजी , नाथभक्तांना सहकार्य व मदत करता यावे यासाठी ही परंपरा सुरु आहे. ही शेकडो वर्षाची परंपरा आहे.