श्री संत सेवालाल जयंती निमित्त भव्य मिरवणूक
विजयपूर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
श्री संत सेवालाल महाराज यांच्या २८६ व्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने दि.२३ रविवार रोजी बंजारा क्रास येथे भव्य सभेचे आयोजन आणि आकर्षक मिरवणूकचे आयोजन करण्यात आल्याचे कार्यक्रमाचे आयोजक व समाजाचे युवा नेते प्रकाश चव्हाण यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत ते म्हणाले, "दयेचा, परोपकाराचा आणि सेवेचा संदेश देणाऱ्या संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीला अर्थपूर्ण पद्धतीने साजरा करण्यासाठी राष्ट्रीय बंजारा परिषद यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातील. महाराष्ट्र, गोवा, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि इतर भागांतील बंजारा समाजाचे नेते या समारंभात सहभागी होणार आहेत."
बंजारा समाजाचे गुरु श्री बाबूसिंग महाराज, कन्हेरी मठाचे श्री अदृश्य कादसिद्धेश्वर महास्वामीजी, श्री बसवजय मृत्युञ्जय महास्वामीजी, श्री बालगयोगी सोमलिंग महास्वामीजी यांच्यासह अनेक गुरु आणि मठाधीश या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
विजयपूर शहराचे आमदार बसनगौडा पाटील यतनाळ हे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहतील, केंद्रीय मंत्री प्रह्लाद जोशी आणि कर्नाटकमधील विधानसभेचे उपाध्यक्ष रुद्रप्पा लमाणी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. असे प्रकाश यांनी सांगितले.
सचिव डॉ. एम. बी. पाटील, शिवानंद पाटील, महाराष्ट्र सरकारचे मंत्री संजयभाऊ राठोड, उद्योगपती किसन बाऊ राठोड, गिरिश महाजन, खासदार रमेश जिगजिणगी, माजी खासदार डॉ. उमेश जाधव यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत, असे ते म्हणाले.
दिपोत्सव, विशेष पूजा आणि इतर धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून सांस्कृतिक कार्यक्रम व सभेच्या अगोदर, एक अर्थपूर्ण आणि कलात्मक मिरवणूक आयोजित केली जाणार असून, ती श्री सिद्धेश्वर मंदिरापासून सुरू होईल. गांधी चौक, राम मंदिर आणि इतर प्रमुख मार्गांवरून मिरवणूक जात, समारंभाच्या ठिकाणी पोहोचेल आणि संपन्न होईल. नागठाणेचे माजी आमदार डॉ. देवानंद चव्हाण मिरवणुकीचे शुभारंभ करणार आहेत.
"बिग बॉस" प्रसिद्ध हनुमंतू या कार्यक्रमात सहभागी होणार असून, प्रसिद्ध गायिका मंगली यांच्या गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
बंजारा समाजाचे गुरु गोपाल महाराज, चंद्रशेखर राठोड, राजू खंडसारी, सुरेश चव्हाण, सुरेश विजयपूर, राजू नायक, शिवा जाधव, विजय चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर पत्रकार परिषदेत उपस्थित होते.