कोची कोचीन ओताकेसा… आणि जिल्हाधिकारी अचंबित
जळगाव मेटे जि.प.शाळेच्या विद्यार्थ्यांनी केले जापानी भाषेत स्वागत
छत्रपती संभाजीनगर - ‘कोची कोची कोचीन ओताकेसा’, असे जापानी भाषेत झालेल्या स्वागताने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी अचंबित झाले. जळगाव मेटे ता. फुलंब्री या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी आज जिल्हाधिकारी यांचे थेट जापानी भाषेत स्वागत केले. विद्यार्थ्यांचे विदेशी भाषेवरील प्रभूत्व पाहून खुद्द जिल्हाधिकारी अचंबित झाले. त्यांनी या विद्यार्थ्यांचे तोंड भरुन कौतूक केले.
मनरेगा योजनेतून जिल्हा परिषद शाळांमधील सुविधांचा विकास व दशसूत्री कार्यक्रमाच्या माध्यमातून संस्कारक्षम व गुणवत्ताधारक विद्यार्थी घडविण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यासाठी फुलंब्री व छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील जि.प. शाळा मुख्याध्यापकांची कार्यशाळा आज आयोजित करण्यात आली होती. छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक संस्थेच्या सभागृहात ही कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी राजर्षी छत्रपती शाहू महाराज सभागृहात दाखल झाले. तेव्हा प्रवेशद्वारावर जिल्हाधिकारी स्वामी यांचे स्वागत जळगाव मेटे येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी जापानी भाषेत स्वागत केले. अचानक व अस्खलित जापानी भाषेच्या उच्चारणाने जिल्हाधिकारी सुखावले. त्यांनी नंतर विद्यार्थ्यांना या वाक्यांचा अर्थही विचारला व विद्यार्थ्यांनी त्यांना अर्थ समजावून सांगितला. सुवर्णा कांबळे या उपक्रमशील शिक्षीका विद्यार्थ्यांना जापानी भाषा शिकवित असतात. प्राथमिक व दैनंदिन जीवनातील संवादाची वाक्ये, शब्द त्यांचे अर्थ या विद्यार्थ्यांना शिकविण्यात येतात. वेगळी भाषा शिकून त्यात प्राविण्य मिळविणे, संवाद साधण्याच्या कौशल्याचा विकास व्हावा यादृष्टीने हा उपक्रम शाळेत राबविला जातो. नारायण जाजेकर हे या शाळेचे मुख्याध्यापक असून या शाळेने अनेक पुरस्कार पटकावले आहेत.
