बसस्थानकांमध्ये चैन हिसकावूने प्रकरणी : तिघांना अटक
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
आलमेल आणि इंडी येथील बसस्थानकांमध्ये महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या मंगळसूत्राची चैन हिसकावून नेणाऱ्या तिघा आरोपींना पोलिसांनी अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.8 फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे 9 वाजता आलमेल बसस्थानकात उभ्या असलेल्या सविता काशीराय तोरवी यांच्या गळ्यातील अंदाजे दीड तोळे वजनाचे, सुमारे ₹1,15,000 किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र दोन चोरट्यांनी मोटारसायकलवर येऊन हिसकावून नेले होते. या संदर्भात सविता यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अशाच प्रकारची चोरी इंडी बसस्थानकातही घडली होती. दोन्ही प्रकरणांचा तपास करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली दोन विशेष तपास पथके स्थापन करण्यात आली होती. विविध अंगांनी माहिती गोळा करून आणि तांत्रिक साधनांच्या मदतीने आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले.
दीपक परशुराम माळी (वय 25), केशव नगर, पुणे.* कायद्याच्या संघर्षात असलेला एक अल्पवयीन मुलगा.* प्रकाश रामचंद्र मुलगी (वय 24), मूळ रहिवासी आळंद तालुका, कलबुर्गी जिल्हा; सध्या कुंजरवाडी, पुणे येथे वास्तव्यास यांना अटक करण्यात आली आहे
चौकशीदरम्यान आरोपींनी एकूण पाच जणांनी मिळून विजयपूर आणि सोलापूर परिसरातून दोन मोटारसायकली चोरी करून त्यांचा वापर इंडी आणि आलमेल बसस्थानकांमध्ये चैन स्नॅचिंगसाठी केल्याची कबुली दिली आहे.
पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली होंडा कंपनीची एक मोटारसायकल तसेच होंडा शाइन मोटारसायकल अशी दोन वाहने जप्त केली आहेत. याशिवाय सुमारे 30 ग्रॅम वजनाचे, अंदाजे ₹2,30,000 किमतीचे सोन्याचे दागिनेही जप्त करण्यात आले आहेत.
एकूण चार गुन्ह्यांमध्ये आरोपींना अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
तांत्रिक साधनांच्या सहाय्याने गुन्ह्याचा उलगडा करणाऱ्या अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यात आले असून त्यांना प्रशस्तीपत्र आणि बक्षीस जाहीर करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख लक्षम निबंरगी यांनी दिली.
