दारुच्या नशेत मित्रांनी केला तरुण मित्राचा खून
विजयपूर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
दारूच्या नशेत एका तरुणाचा विटेने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आलेली घटना विजयपूर शहरातील सिंदगी रोडवर घडली आहे.
फैसल हकीम (वय २८) असे त्या तरुणाचे नाव असून, पोलीसांच्या माहितीनुसार, दारूच्या नशेत तिघा युवकांमध्ये झालेल्या भांडणातून ही हत्या घडली आहे. मृत युवक हे दोघा आरोपींसोबत मिळून एकत्रितपणे मद्यपान करत होता. तिघेही एकत्र दारू प्यायला जमले होते. मात्र दारू पिल्यानंतर, काही कारणास्तव तिघांमध्ये वाद झाला. त्यावेळी, दोघांनी तिसऱ्या फैसलला विटेने बेदम मारहाण करून त्याची हत्या केली आणि तेथून फरार झाले, अशी माहिती समोर आली आहे.
मृत युवकाचा मृतदेह रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी येऊन तपास केला. हत्या पाहून रस्त्यावर नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती आणि बघ्यांची गर्दी झाली होती.
ही घटना गोलघुमट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. हत्या नेमकी कशामुळे झाली, आरोपी कोण आहेत, याचा शोध घेण्यासाठी पोलीस करीत आहेत. अद्याप हत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. या घटनेने स्थानिकांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मद्यपानामुळे होणाऱ्या वाईट परिणामांवर आता लोकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला असून, संपूर्ण पार्श्वभूमी उघड करण्यासाठी पुरावे गोळा केले जात आहेत.
